Satara | श्रीकृष्ण जन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात साजरी

सातारा, (प्रतिनिधी) – श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिरा नजीकच्या श्री. दिवशीकर बंधूंच्या श्री मुरलीधर मंदिरात या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी श्री रामकृष्ण सेवा मंडळाचे भक्तांनी श्री शाम नाम संकीर्तन तसेच कृष्ण पदांचे गायन केले. सायंकाळी शंकराचार्य मठातील वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी व त्यांच्या अकरा ब्रह्मावृंदांनी मंत्र जागर पठण केले.
सोमवारी सकाळी जन्माष्टमी निमित्त वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनपर पौरोहित्याखाली दिवशीकर परिवारातील बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत दिवशीकर, सुनित दिवशीकर, संदीप दिवशीकर,स्वानंद दिवशीकर, सुमेध दिवशीकर तसेच दिवशीकर परिवारातील सदस्यांच्या हस्ते विधिवत श्रीकृष्णाची महापूजा करण्यात आली.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध रंगातील पडदे व फुलांच्या माळांनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले जात होते.
मंदिराच्या प्रांगणात काढलेली माखन चोर बालकृष्णाची विविध रंगातील देखणी रांगोळी ही तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरत होती. मंदिरात सातारा शहर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची जन्मकथा वर्णन करत.. भगवान गोपाल कृष्ण की जय, मुरलीधर की जय ,जय श्रीकृष्ण.. असा मोठ्या आवाजात घोषणा देत उपस्थित कृष्ण भक्तांनी हा जन्मोत्सव साजरा केला.मंगळवारी सायंकाळी दहीहंडी फोडून काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सातारा शहरातील मेढा रस्त्यावरील हमदाबाज येथील इस्कॉन संघाचे वतीने ही मंदिरात जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. करंजे परिसरातील श्री महानुभाव मठात भव्य श्रीकृष्ण मूर्तीला अतिशय सुरेख सजवण्यात आले होते.
कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव वेदमूर्तींच्या मंत्रजागर तसेच विविध श्रीकृष्ण स्तोत्रांच्या पठणाने उत्साहात संपन्न झाला.
श्रीक्षेत्र गिरवी, गोंदवले येथे जन्मोत्सव उत्साहात
फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र गिरवी येथील देशपांडे व परिवाराच्या गोपाल कृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंदिरामध्ये या जन्मोत्सवानिमित्त विष्णुसहस्रनाम पठण तसेच गीता पठण करण्यात आले, अशी माहिती मंदिराचे मुख्य मालक जयंत देशपांडे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधी स्थळी असलेल्या मंदिरातील श्रीकृष्ण मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.





