US-Iran War: दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना; हिंदी महासागरात सापडले 87 मृतदेह
US-Iran War: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितले की आतापर्यंत सुरू असलेल्या युद्धात इराणच्या किमान १७ युद्धनौका बुडवण्यात आल्या आहेत. "आम्ही इराणचे संपूर्ण नौदल बुडवत आहोत," असे ते एका व्हिडिओ संदेशात म्हणाले.

US-Iran War: अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ हिंदी महासागरात इराणची युद्धनौका IRIS डेना बुडवली असून श्रीलंकेच्या नौदलाने बुधवारी ८७ मृतदेह शोधून काढले आणि ३२ जणांना वाचवले. या जहाजावर १८० जण होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिली घटना
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी पेंटागनच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, बुडवलेली IRIS डेना ही इराणची सर्वात महत्त्वाची युद्धनौका होती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने टॉर्पेडोने शत्रूची जहाज बुडवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
https://t.co/PiqQpVIrMu pic.twitter.com/Wc1e0B0um7
— Department of War 🇺🇸 (@DeptofWar) March 4, 2026
श्रीलंकेला बचावकार्याची माहिती मिळाली
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत सांगितले की, IRIS डेना संकटात असल्याची आणि बुडत असल्याची माहिती श्रीलंकेला मिळाल्यानंतर नौदल जहाजे आणि हवाई दलाची विमाने बचावकार्यासाठी रवाना केली. मात्र जहाजे घटनास्थळी पोहोचेपर्यंत युद्धनौकेचा कोणताही मागमूस नव्हता. नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपथ यांनी सांगितले की, समुद्रावर फक्त तेलाचे डाग आणि लाइफ राफ्ट दिसत होते आणि काही लोक पाण्यात तरंगत होते.
हेही वाचा: 30 दिवसांत गॅस सिलिंडर संपणार? पश्चिम आशियातील युद्धाचा भारताला मोठा फटका!
जखमींवर उपचार सुरू
वाचवलेल्या ३२ जणांना श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील गाळे या शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अनिल जसिंघे यांनी सांगितले की एक जण अतिदक्षता विभागात असून सात जणांवर आपत्कालीन उपचार सुरू आहेत. उर्वरितांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
IRIS डेना कोण होती?
IRIS डेना ही इराणची सर्वात आधुनिक युद्धनौकांपैकी एक होती. ही खोल समुद्रात गस्त घालण्यासाठी वापरली जात होती. जड तोफा, हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि एक हेलिकॉप्टर असे या नौकेचे शस्त्रसज्ज सामर्थ्य होते. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह अनेक देशांना भेट देणाऱ्या इराणच्या आंतरराष्ट्रीय नौका दौऱ्यात IRIS डेना ही प्रमुख नौका होती. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने फेब्रुवारी २०२३ मध्ये या नौकेवर निर्बंध लादले होते.
इराणचे संपूर्ण नौदल बुडवण्याचा इशारा
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितले की आतापर्यंत सुरू असलेल्या युद्धात इराणच्या किमान १७ युद्धनौका बुडवण्यात आल्या आहेत. “आम्ही इराणचे संपूर्ण नौदल बुडवत आहोत,” असे ते एका व्हिडिओ संदेशात म्हणाले.





