Sri Lanka Cricket : इंग्लंड मालिकेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, डोपिंगमध्ये अडकलेल्या ‘या’ स्टार खेळाडूवर सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यास बंदी…

Sri Lanka Cricket : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून मोठी बातमी येत आहे. श्रीलंकेच्या एका स्टार क्रिकेटरवर डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यानंतर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. हा श्रीलंकेचा क्रिकेटर आहे निरोशन डिकवेला. डिकवेलावर सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किती काळ असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगदरम्यान डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याप्रकरणी निरोशन डिकवेलावर बंदी घालण्यात आली आहे.
किती काळ असेल बंदी?
लंका प्रीमियर लीग (एलपीएल)मध्ये डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या निरोशन डिकवेलवर बंदी किती काळ असणार याची अधिकृत घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार आहे. निरोशन डिकवेला लंका प्रीमियर लीग 2024 मध्ये गॅले मार्व्हल्सचे नेतृत्व करत होता आणि त्याने 10 डावात 184 धावा केल्या होत्या. संघाला अंतिम फेरीत जाफना किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात डिकवेला 8 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला होता.
यापूर्वीही घालण्यात आली आहे बंदी…
बंदीचा सामना करण्याची निरोशन डिकवेला याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये, इंग्लंडमध्ये बायो बबलचे उल्लंघन केल्याबद्दल दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. निरोशन दीर्घकाळापासून श्रीलंकेच्या संघाचा भाग नाही.
डिकवेलाची कारकीर्द…
निरोशन डेकवेला याने श्रीलंकेसाठी 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2757 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1604 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 480 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आहेत. डिकवेला 2023 मध्ये शेवटची कसोटी, 2022 मध्ये शेवटची वनडे आणि 2021 मध्ये शेवटची टी-20 सामना खेळला आहे.




