श्रीलंकेने २१ भारतीय मच्छिमारांना मायदेशी पाठवले

कोलंबो, (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या २१ मच्छिमारांना आज भारतात परत पाठवण्यात आले, असे श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सांगितले.
दिनांक ८ डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ८ मच्छिमारांना रामेश्वरमच्या किनाऱ्याजवळ पकडले होते आणि मासेमारीच्या २ बोटी देखील ताब्यात घेतल्या होत्या. हे पकडलेले मच्छिमार मंडपम येथून समुद्रात गेले होते. या मच्छिमारांनी सागरी हद्द ओलांडल्याचा आरोप श्रीलंकेच्या नौदलाने केला होता. त्यानंतर त्यांना कनकेसंथुराई नेव्हल कॅम्पमध्ये नेण्यात आले होते, असे मंडपम मच्छिमार संघटनेने म्हटले आहे.
दिनांक ७ डिसेंबर रोजी रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम उत्तर किनाऱ्यावरून ३२४ बोटीतून समुद्रात गेलेले मच्छिमार पाल्क बे समुद्रधुनीच्या परिसरातील डेल्फ्ट बेटाजवळ मासेमारी करत होते. त्यावेळी श्रीलंका नौदलाने त्यांना पकडले होते आणि २ बोटीही ताब्यात घेतल्या होत्या.





