Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

कोलंबो – श्रीलंकेत हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांना दिले आहेत. सार्वजनिक मालमत्तेची लूट करणारे आणि इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांवर गोळ्या झाडाव्यात, असे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
जनतेने हिंसेचा मार्ग सोडावा आणि सूडबुद्धीने कोणतीही कृती करू नये, असे आवाहन अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी केले आहे. देशासमोर सध्या असलेल्या आर्थिक संकटावर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही गोटाबाये राजपक्षे यांनी जनतेला दिले आहे.
जनतेने हिंसेचा मार्ग सोडावा असे आवाहन श्रीलंकेचे संरक्षण महासंचालक कमल गुणरत्ने यांनीही काल केले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि लुटालूट झाल्यास संरक्षण मंत्रालयाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. शांततेने आंदोलन करत असतानाच आंदोलकांना हिंसाचार करण्याची संधी मिळाली आहे, मात्र नागरिकांनी हिंसेपासून दूर रहावे आणि लोकशाही मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवावे, असेही गुणरत्ने यांनी म्हटले होते.
माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आश्रय घेतलेल्या त्रिंकोमाली नाविक तळाबाहेर सरकारविरोधी निदर्शकांनी हिंसक निदर्शने करायला सुरुवात केल्यावर संरक्षण महासंचालकानी हा इशारा दिला होता. तरुणांना शांततापूर्ण वर्तनाचा सल्ला देण्याचे आवाहनही गुणरत्ने यांनी धार्मिक नेत्यांना केले.
दरम्यान तत्कालिन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी आंदोलकांवर हल्ला केल्यामुळे सुरू झालेल्या या आंदोलनात सोमवारपासून मरण पावणाऱ्यांची संख्या 8 झाली आहे. जरी थोरले बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला असला तरी आंदोलक शांत झालेले नाहीत. आता आंदोलकांना अध्यक्ष धाकटे बंधू गोटाबाये राजपक्षे यांचाही राजीनामा हवा आहे.
कोलंबो आणि देशाच्या इतर भागात झालेल्या हिंसाचारात जवळपास 250 लोक जखमी झाले आहेत. भीषण आर्थिक संकटादरम्यान जमावाने सत्ताधारी राजपक्षे कुटुंबाचे वडिलोपार्जित घर जाळल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. राजपक्षे कुटुंबातील निष्ठावंतांना देश सोडून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारविरोधी निदर्शकांनी कोलंबोतील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चौकीही उभारली आहे.





