Sri Lanka Crisis : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या ‘एक दिवस’आधी श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का

कोलंबो – सध्या श्रीलंका आर्थिक संकटाबरोबरच राजकीय अस्थिरतेशीही झुंजत आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला असून त्यांनी राजीनामाही दिला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे त्यांचा पदभार संभाळत आहेत. देशातील नव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले विरोधी पक्षनेते संजिथ प्रेमदासा यांनी आपले नाव मागे घेतले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मला प्रिय असलेल्या माझ्या देशाच्या भल्यासाठी मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीतून माघार घेतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. विरोधकांच्या सहकार्यासाठी आमचा पक्ष कठोर परिश्रम करेल, असे ते म्हणाले.
स्वत: उमेदवारी अर्ज केला होता दाखल
यापूर्वी स्वत: संजिथ प्रेमदासा यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. ते म्हणाले की, या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आमच्याकडे निश्चितपणे योजना आहे. आम्ही तीन वर्षांपासून गोटाबाया सरकारला चुकीच्या सल्ल्याने आर्थिक पावले उचलू नका, असे सांगत आहोत. त्यांनी आमचे ऐकले नाही आणि आपण आता आपत्तीच्या स्थितीत पोहोचलो आहोत.
तीन उमेदवार जाहीर
संजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने राष्ट्रपतीपदासाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान आणि कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हापेरुमा आणि अनुरा कुमारा डिसनायके हे उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील.





