Sri Lanka Players Penalized : भारत-श्रीलंका ‘अ’ संघातील राड्याप्रकरणी पहिली मोठी कारवाई! मॅच रेफरीने श्रीलंकेच्या २ खेळाडूंना सुनावली शिक्षा
Sri Lanka Players Penalized : सुपर ओव्हर सामन्यादरम्यान झालेल्या लज्जास्पद राड्याप्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sri Lanka Players Penalized for IND A vs SL A Fight : भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील सुपर ओव्हर सामन्यादरम्यान झालेल्या लज्जास्पद राड्याप्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला “घरी जा” म्हणून डिवचणाऱ्या श्रीलंकेच्या विशेन हालामबेगेवर मॅच रेफरी प्रदीप जयप्रकाश यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या वादात विशेन हाच मुख्य दोषी आढळल्याने त्याला मोठी शिक्षा मिळाली आहे. मात्र, भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्यावर कोणतीही कारवाई किंवा बंदी घालण्यात आली आहे की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाद मिटवणाऱ्या निरोशन डिकवेलावरही लागला दंड –
या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मॅच रेफरीने श्रीलंकेचा अनुभवी यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याच्यावरही मोठा दंड ठोठावला आहे. डिकवेला हा तोच खेळाडू होता ज्याने मैदानात धाव घेऊन वैभव सूर्यवंशी आणि विशेन यांच्यातील हाणामारी थांबवली होती. मात्र, डिकवेलाला या वादासाठी नाही, तर मैदानातील एका दुसऱ्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. डिकवेलाने सामन्यादरम्यान पंचांकडे मर्यादेपेक्षा जास्त आणि आक्रमक ‘अपिल’ केल्यामुळे त्याच्यावर हा बडगा उगारण्यात आला आहे.
पंचांच्या रिपोर्टवर थेट निर्णय; रेफरीचा खास इतिहास –
मॅच रेफरी प्रदीप जयप्रकाश यांनी या प्रकरणात दोन्ही संघांच्या खेळाडूंना समोरासमोर बोलावून कोणतीही औपचारिक सुनावणी किंवा चौकशी केली नाही. त्यांनी मैदानी पंचांनी दिलेल्या अधिकृत अहवालाच्या आधारावर थेट दोषी खेळाडूंना शिक्षा सुनावली. ४२ वर्षीय प्रदीप जयप्रकाश हे श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे आणि तो २००५ मध्ये भारताविरुद्ध याच दांबुलाच्या मैदानावर खेळला होता.
‘आयसीसी’चा संबंध नाही; कारवाईत श्रीलंका बोर्ड दुःखी –
सामन्यात घडलेल्या या प्रकारामुळे श्रीलंका क्रिकेट वर्तुळात प्रचंड नाराजी आणि खेद व्यक्त केला जात आहे. भारतासारख्या मित्रदेशाच्या खेळाडूंसोबत स्वतःच्याच देशात असा अपमानास्पद प्रकार घडल्याने तिथले लोक अधिक दुःखी आहेत. दरम्यान, खेळाडूंवरील ही कडक कारवाई श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केली असून, यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचा कोणताही सहभाग नाही.





