SRH vs PBKS : “खरं सांगायचं तर, सामन्याच्या चार दिवस आधी मी…’, अभिषेकचा शतकाबद्दल मोठा खुलासा

SRH vs PBKS Abhishek Sharma Revealed he was sick after century : आयपीएल २०२५ च्या २७ व्या सामन्यात अभिषेक शर्माने शतक ठोकून इतिहास रचला. त्याने ५५ चेंडूत १४१ धावा केल्या आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला. या बाबतीत अभिषेकने केएल राहुलला मागे टाकले. सामन्यानंतर, या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या पहिल्या आयपीएल शतकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या दरम्यान त्याने एक मोठा खुलासा केला की, सामन्यापूर्वी चार दिवसांपासून त्याला ताप येत होता.
अभिषेक शर्मा चिट्ठी दाखवण्याबद्दल काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना अभिषेक शर्मा चिट्ठीबद्दल म्हणाला, “मी ती शनिवारीच लिहिली होती. सहसा मी सकाळी उठल्यावर काही तर लिहित असतो. आज सकाळी माझ्या मनात कल्पना आली की जर मी या सामन्यात काही खास करू शकलो, तर ते ऑरेंज आर्मीसाठी असेल. मी भाग्यवान होतो की आजचा दिवस माझ्या बाजूने होता. कारण या सामन्यात दबाव होता. विशेषतः जेव्हा संघ सामना हरत असतो. पण संघात असे कोणतेही वातावरण नव्हते की मला वाटले की आपण सामना हरत आहोत. कोणाचीही मानसिकता नकारात्मक नव्हती. सर्वजण सकारात्मक होते. सर्वांनाच अशी अपेक्षा होती की असा स्फोट होणार आहे.”
आजारी असताना कोण दोघे होते संपर्कात –
https://twitter.com/urstrulyGopala/status/1911117401141243967
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला, “खरं सांगायचं तर, सामन्याच्या चार दिवस आधी मी आजारी होतो. माझ्या आयुष्यात युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव सारखे लोक असल्याने मी खूप भाग्यवान आहे, असे मला वाटते. ते मला सतत फोन करायचे आणि सांगायचे की, मी असं काहीतरी करू शकतो. जर काही सामने वाईट गेले, तर खेळाडू स्वतःवर शंका घेऊ लागतो, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जेव्हा असे खास खेळाडू तुमच्यावर विश्वास दाखवतात, तेव्हा तुम्हाला स्वतःवरच आपसूकच विश्वास येऊ लागतो. मला फक्त एका डावाची गरज होती. मी याची आतुरतेने वाट पाहत होतो आणि या सामन्यात ते घडले.”
हेही वाचा – LSG vs GT : धक्कादायक! निकोलसच्या आक्रमक शॉटने चाहत्याचं फुटलं डोकं, VIDEO होतोय व्हायरल
अभिषेकने वडिलांसमोर साकारली वादळी खेळी –
अभिषेक शर्माने राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. ५५ चेंडूंचा सामना करत अभिषेकने १४१ धावांची संस्मरणीय खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान १४ चौकार आणि १० षटकार मारले. आयपीएलच्या इतिहासात, हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाने अभिषेकपेक्षा एका डावात जास्त षटकार मारलेले नाहीत. अभिषेकच्या वडिलांनी यापूर्वी कधीही त्यांच्या मुलाला स्टेडियममध्ये थेट खेळताना पाहिले नव्हते. ते पहिल्यांदाच मैदानावर त्याचा सामना पाहण्यासाठी आले होते आणि लेकांच्या वादळी खेळीने त्यांचा ऊर भरून आला.





