काशेवाडी येथे एसआरए प्रकल्प राबवावा; आमदार सुनील कांबळे यांची मागणी

पुणे – काशेवाडी, भवानी पेठ परिसरात एसआरए प्रकल्प अधिकृतरीत्या राबविण्यात यावा आणि नागरिकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. गुलटेकडी येथील स्व. मीनाताई ठाकरे वसाहतीच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवावा, असे त्यांनी पत्राद्वारे सुचवले आहे.
आमदार कांबळे यांनी दिलेल्या पत्रानुसार , सध्या काशेवाडी परिसरात काही राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. विविध आमिषे दाखवून, खोटी कारणे सांगून आणि जबरदस्तीने कागदपत्रे जमा करून एसआरए प्रकल्पासाठी संमती घेतली जात आहे. विशेषतः, काही ठिकाणी एका घरातील केवळ एका व्यक्तीची संमती घेतली जात असून, काही ठिकाणी बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर संमती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याही बिल्डर किंवा विकसकाला अधिकृत आदेश दिलेला नाही. मात्र, तरीही नागरिकांची दिशाभूल करून परस्पर संमती घेण्याचे काम सुरू आहे. काशेवाडी भागात मोठ्या प्रमाणावर अशिक्षित नागरिक असल्याने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे हा गैरप्रकार तत्काळ थांबवून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घरे मिळावीत, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या वतीनेच अधिकृत एसआरए प्रकल्प राबविल्यास पारदर्शकता राहील आणि नागरिकांना योग्य न्याय मिळेल, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले.





