काशेवाडीत हजारो महिलांचा महाआरती जागर; सोन्याची जेजुरी देखाव्याने वेधले लक्ष

पुणे : नवरात्रोत्सवाच्या मंगल वातावरणात काशेवाडीत महिलांसाठी आयोजित भव्य महाआरतीत हजारो महिला सहभागी झाल्या. अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेविका अर्चनाताई तुषार पाटील यांच्या वतीने हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार विशेष उपस्थित होते. प्रभागातील एक हजारहून अधिक महिलांनी महाआरतीत उत्साहाने सहभाग घेतल्याने परिसर भक्तिमय झाला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सोन्याची जेजुरी या संकल्पनेवर आधारित सादर केलेला देखावा ठरला. या भव्य व कलात्मक देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
महिलांसाठी पारंपारिक वाणवाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले. विजयादशमीच्या शुभेच्छांसह हा सोहळा काशेवाडीतील नवरात्रोत्सवाचा अविस्मरणीय भाग ठरला.





