Spying for China: हेरगिरीचा नवा अध्याय! चीनच्या नव्या रणनीतीने जगभरात खळबळ
Spying for China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ ज्यावेळी चीनच्या दौऱ्यावर गेले होते,

Spying for China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ ज्यावेळी चीनच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणे अमेरिकेतच ठेवली होती, अशा बातम्या समोर आल्या होत्या.
त्यासोबतच चीन आपल्या उपकरणांवर हेरगिरी करेल किंवा त्यात स्पायवेअर टाकेल या भीतीने, अमेरिकेने चीनकडून मिळालेल्या सर्व भेटवस्तू विमानतळावर कचऱ्यात फेकून दिल्या.
चीन आपल्या नागरिकांवर हेरगिरी करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे, पण आता या ड्रॅगनने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका ताज्या अहवालानुसार, चीन परदेशी नागरिकांवरही हेरगिरी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही हेरगिरी कशी उघडकीस आली? (Spying for China)
माध्यमांच्या वृत्तानुसार, एका सायबर सुरक्षा संशोधकाने एका ऑनलाइन डेटाबेसद्वारे शोधून काढले की, चीनमध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या शेकडो परदेशी नागरिकांची वैयक्तिक माहिती एका प्लॅटफॉर्मवर नोंदवली गेली होती.
यामध्ये पासपोर्ट तपशील, मोबाईल क्रमांक, प्रवासाचा तपशील, रुग्णालयाला दिलेल्या भेटी आणि इतर हालचालींचा समावेश होता. या डेटाचा वापर कितपत झाला हे अस्पष्ट असले तरी, या खुलाशाने चीनबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
परदेशी प्रवाशांची वैयक्तिक माहिती
या डेटाबेसला “डायनॅमिक कंट्रोल प्लॅटफॉर्म फॉर ओव्हरसीज पर्सनल” (Dynamic Control Platform for Overseas Personnel) असे म्हटले जाते. चीनच्या पाळत ठेवण्याच्या प्रणालीवर संशोधन करणारे मार्क होफर यांनी सर्वप्रथम याचा शोध लावला.
त्याने सांगितले की, वेबसाईट उघडल्यावर त्याला स्वतःचा फोटो, पासपोर्ट क्रमांक आणि चीनमध्ये असताना वापरलेला मोबाईल क्रमांक दिसला. त्या प्लॅटफॉर्मवर ७०० हून अधिक परदेशी नागरिकांची आणि झांगजियाकोऊ शहराशी संबंधित सुमारे १२,००० नोंदी होत्या. यामध्ये परदेशी पत्रकार, हाँगकाँग आणि तैवानमधील लोक, तसेच शहराशी थेट संबंध नसलेल्या अनेक नावांचा समावेश होता.
ही माहिती कुठून आणि कशी आली? (Spying for China)
अहवालानुसार, या प्लॅटफॉर्मवर नोंदवलेली माहिती केवळ सीसीटीव्ही कॅमेरा डेटाबेसमधूनच नव्हे, तर रुग्णालये, गॅस बिले, प्रवासाच्या नोंदी, चेहरा ओळख प्रणाली, रेल्वे आणि विमान बुकिंग यांसारख्या विविध प्रणालींमधील डेटामधूनही होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एखादी व्यक्ती डॉक्टरांना कधी भेटली, त्यांनी गॅसवर किती खर्च केला आणि कोणत्या रेल्वे किंवा विमानात ते कोणत्या सीटवर बसले होते, याची माहितीदेखील त्या पोर्टलवर उपलब्ध होती.






