‘सुर नवा ध्यास नवा’ मधून स्पृहा जोशीचा पत्ता कट; ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘सुर नवा ध्यास नवा’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय आहे. आतापर्यंत या शोचे पाच पर्व झाले आहेत. येत्या 7 ऑक्टोबरपासून या शोचे सहावे पर्व सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक माहिती समोर आली आहे. नव्या पर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. आता या शोमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha joshi) सूत्रसंचालन करताना दिसणार नाही. त्याच्या जागी आता नव्या अभिनेत्रीला संधी देण्यात आली आहे.
परंतु, नव्या पर्वात स्पृहा नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कलर्स मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्पृहाऐवजी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील (Rasika sunil) सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या व्हिडिओला असे कॅप्शन दिले आहे की,’महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला येतेय ‘सूर नवा ध्यास नवा’ची नवी अँकर – रसिका सुनील!’ हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी स्पृहा जोशीला परत आणण्याची मागणी केली आहे.
View this post on Instagram
यावर नेटकऱ्यांनी ‘आम्हाला स्पृहाच हवी आहे’, ‘स्पृहाच बेस्ट आहे’, अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची सूत्रसंचालक तेजश्री प्रधान होती, तर पुढील साऱ्या पर्वामध्ये स्पृहा जोशी सूत्रसंचालक होती. यावेळी स्पृहाला प्रेक्षकांचे देखील भरभरून प्रेम मिळाले. मात्र आता ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेत्री रसिका सुनील सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर,अवधूत गुप्ते आणि महेश काळे हे परिक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत.





