‘जीआर रद्द झाला खरा…पण!!!’; हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेताच स्पृहाच्या कवितेने वेधले साऱ्यांचे लक्ष

Spruha Joshi | राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. राजकीय नेत्यांपासून साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंतांपर्यंत अनेकांनी हिंदी सक्तीला विरोध केला होता. अखेर वाढता विरोध पाहता हिंदी सक्तीचा जीआर राज्य शासनाच्या वतीनं मागे घेण्यात आला आहे.
तसेच सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा सरकारने केली. हिंदी सक्तीचा जीआर रद्द होताच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने कविता शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्रीसह कवयित्री सुद्धा आहे. सोशल मीडियावर ती विविध विषयांवरील कविता शेअर करत असते. अशातच स्पृहाने हिंदी भाषा सक्तीचे जीआर रद्द करताच कविता सादर केली आहे. तसेच या कवितेचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्पृहाने शेअर केलेल्या या कवितेचं शीर्षक ‘मायबोली’ असे आहे.
&
View this post on Instagram
;
जीआर रद्द झाला खरा.. पण!!!
ज्ञानोबांची अमृतबोली
ज्ञानाची रसगंगा
मायबोलिच्या उरे अंगणी
आता केवळ दंगा
परंपरेतुन अभंग झाली
अमुची मायमराठी
अभिजात तिचे सौंदर्य देखणे,
कायम अमुच्या पाठी.
परंतु चाले खेळ अनोखा
महाराष्ट्र देशा
अपुल्या डोळ्यासमोर हरवे
आपुलीच हो भाषा.
सत्ताधारी कुणी विरोधी
मोठी राजघराणी
हताश होऊन बघे मराठी
उदास केविलवाणी!
मंत्रालय वा हो न्यायालय
दबकत पाउल टाकी..
अधिक- उणे च्या गणितामध्ये
उरली केवळ ‘बाकी!’
श्रेय लाटुनी मराठिचे
वर उद्धाराच्या बाता
मुळी न वाटे लाज तयांना
नक्राश्रू ढाळता.
राजनीतिच्या पटावरूनी
हलती प्यादी सारी,
उगा उमाळे, कढ हे खोटे
बोलायाची चोरी! दुस्वासा कुठल्या भाषेच्या
मुळी नसावा थारा
सक्तीने पण होऊन जातो
जीव उगाच बिचारा!
कोणासाठी कोणा कारण
हा कट रचला जातो..
एकशे पाच हुतात्म्यांचा
श्वास पुन्हा गुदमरतो..
मायबोलिच्या पुनरुथ्थाना
असेच काही व्हावे
ज्ञानोबांनी सदेह आता
मराठदेशी यावे!”
दरम्यान, स्पृहाने शेअर केलेली ही कविता अनेकांच्या पसंतीस पडली आहे. स्पृहासह हेमंत ढोमे, किरण माने, वैभव मांगले, सचिन गोस्वामी, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे तसंच रवी जाधव या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिंदी सक्तीला विरोध केला होता. सध्या स्पृहाच्या या सुंदर कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा:
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त झाले ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची सोन्याच्या किंमत





