Nagar | साथीच्या आजारांचा फैलाव, दवाखाने हाऊसफुल्ल !

श्रीगोंदा, {योगेश चंदन} – वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून , साथीच्या आजारांमुळे लहान मुलांसह अनेक मोठे माणसं आजारी पडल्याने शहरासह तालुक्यातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.
याचाच फायदा घेऊन ग्रामीण भागातील दवाखाने आणि लॅब चालक यांनी हातमिळवणी करत विविध तपासण्यांच्या नावाखाली रुग्णांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराचे १८ रुग्ण तर मलेरियाचे ५ रुग्ण आढळून आले असताना नगरपालिका तसेच ग्रामपंचायती यासारख्या स्थानिक प्रशासनाकडून साथ नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना ढगाळ वातारणामुळे साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार झाले आहे. पावसाच्या पाण्याचे डबके साठणे , गवताचे प्रमाण वाढल्याने मच्छरांची संख्या वाढली आहे. पोषक वातावरणामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
रुग्णांमध्ये अंगदुखी, तीव्र ताप, अंग खाजवणे, अंगावर पुरुळ येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप, टायफाईड यासारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहे.
साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच तालुका आरोग्य विभागामार्फत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी धूर फवारणी करणे, स्वच्छता मोहीम राबविणे तसेच रुग्णांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे.
मात्र, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार नागरिकांमधून पुढे येत असल्याने प्रशासनाबाबत नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील अनेक डॉक्टरांकडे होमिओपॅथी उपचार करण्याचा परवाना आहे. मात्र, या डॉक्टरांनी ऑन कॉल कन्सल्टंट, व्हिजिटर्स डॉक्टरांच्या नावाने सिव्हील सर्जन यांच्याकडून परवाना प्राप्त करत दवाखाना सुरू करून तेथे रुग्णांना ऍडमिट करून घेत त्यांच्यावर विना अनुभव उपचार करण्याचा धंदाच काही बीएचएमएस (होमिओपॅथी) डिग्रीधारक डॉक्टरांकडून सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.
सामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक
खासगी रुग्णालयांवर तसेच लॅबचालक यांच्यावर शासनाचा कोणताही अंकुश नसल्याने सामान्य नागरिकांना लुटण्याची एकही संधी काही खासगी रुग्णालये सोडताना दिसत नाहीत.
खाजगी रुग्णालय आणि लॅब चालक यांच्यात हातमिळवणी होऊन विविध तपासण्यांच्या नावाखाली सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून खिशाला कात्री लावण्याचे प्रकार तालुक्यात घडत आहे.





