पुणे | महापालिकेच्या प्रवेशद्वारातच धूर फवारणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र, पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळे ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी चक्क महापालिकेतच धूर फवारणी आंदोलन करण्यात आले.
साथरोगांच्या बाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह कोथरूड परिसरातील नागरिकांनी हे अनोखे आंदोलन केले. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेतली जाते.
मात्र, त्यानंतर या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे सोसायटी, बैठी घरे, गृहसंकुलांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तपासणी मोहीम करणे, नागरिकांना नोटिसा बजावणे, एवढेच सोपस्कार आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात.
मात्र, त्यानंतर या नागरिकांना वेळेत उपचार मिळतात का, याबद्दल कोणतीही उपाययोजना महापालिकेकडे नाही. कोथरूड परिसरात पालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे येथे नागरिकांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागतात.
ज्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. याबाबत वारंवार प्रशासनाला सांगून देखील बांधून पूर्ण असलेले पालिकेचे रुग्णालय अद्यापही सुरू करता आलेले नाही. प्रशासनाला ही विदारक परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे बालवडकर यांनी या वेळी सांगितले.





