SPPU News: पुणे विद्यापीठात कोट्यवधींची ‘उधळपट्टी’? आरटीआयनं उघडलं भ्रष्टाचाराचं पितळ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने २०१८ मध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. माहिती अधिकार अर्जाला विद्यापीठानेच दिलेल्या उत्तरातून साहित्य खरेदीच्या मोठमोठ्या रकमा, त्यावर झालेला अवाजवी खर्चाचा तपशील स्पष्ट झाला असून, या बाबत चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी रुसा प्रकल्प व आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पासाठीच्या साहित्य खरेदीसंदर्भात विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या ६ कोटी रुपयांच्या प्रकल्पात विद्यापीठाने किमान साडेतीन कोटी रुपये जास्तीचे खर्च केले आहेत.
त्रयस्थ संस्थेमार्फत प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी वेलणकर यांनी राज्याचे मुख्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली.रुसा प्रकल्प व आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पासाठीच्या साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे.
यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पासाठीच्या साहित्य खरेदीसाठी अव्वाच्या सव्वा दराने विविध साहित्य खरेदी करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाकडून युपीएससाठी ५९ लाख रुपये, ईएसएसएल ॲक्सेस कंट्रोल सिस्टिमसाठी १९ लाख रुपये,
फायर अलार्म सिस्टिमसाठी ५८ लाख रुपये, सीसीटीव्ही प्रणालीसाठी ३६ लाख रुपये, वातानुकुल प्रणालीकरीता ४० लाख रुपये याप्रमाणे जास्तीचा खर्च करण्यात आला आहे, असे वेलणकर यांनी स्पष्ट करीत विद्यापीठाच्या कारभारावर टिका केली आहे.
विद्यापीठ पडताळणी करणार…
तांत्रिक खरेदी व्यवहारांमध्ये कथित त्रुटी, अनियमिततांचा आरोप करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करताना विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचा, इतर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला होता, असे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र, आरोपांची दखल घेत विद्यापीठ प्रशासन या संपूर्ण प्रकल्पाची सत्य पडताळणी करत आहे.
पडताळणी झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारावर कोणतीही तडजोड न करता आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.





