SPPU News : पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! कंत्राटी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ; आता दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये
SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागात करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली आहे.

SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागात करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या प्राध्यापकांच्या मानधनात दहा हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता या प्राध्यापकांना ४० हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक शनिवारी (दि. २५) छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील सुविधांसाठी रुबी हॉल क्लिनिकसमवेत येत्या वर्षातही करार करण्यात येणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना वैद्यकीय व आपत्कालीन सुविधा उपलब्ध होणार आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेचा करार करण्यासाठी ४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली,
तसेच विविध परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक समन्वयकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शनी भागातून प्रभावी दर्शन व्हावे, यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
भारतीय शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरात सुमारे ३ एकर जागेवर जागतिक दर्जाचे नृत्य संकुल उभारण्यासाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, यासंदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत.
“विद्यार्थी हित, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि सांस्कृतिक विकास या बाबींचा गतिमान प्रशासनाद्वारे समतोल साधणार असल्याचे या निर्णयाद्वारे अधोरेखित होत आहे.”
– प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, पुणे विद्यापीठ






