SPPU News : भारतीय ज्ञान परंपरेची आधुनिक शिक्षणाला जोड; कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन
SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष उपक्रम संपन्न.

SPPU News – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवणे अनिवार्य आहे. ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर समृद्ध पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक ज्ञानाची सांगड घालणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
विद्यापीठांतर्गत यू.जी.सी. मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या समारोपावेळी ते बोलत होते. डॉ. गोसावी म्हणाले की, भारताच्या उज्ज्वल भविष्यात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यापर्यंत केवळ माहिती नव्हे, तर मूल्य शिक्षण पोहोचवणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि यूजीसीचे सचिव डॉ. मनीष जोशी यांनी भारतीय ज्ञान प्रणालीच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. समारोपास प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एच.आर.डी.सी.चे समन्वयक डॉ. सचिन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कलापिनी अगस्ती म्हणाल्या, भारतीय ज्ञान परंपरा हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो आचरणात रुजवायचा संस्कार आहे.
शिक्षकांनी देशाचा इतिहास आणि संस्कृतीचे सकारात्मक पुनर्लेखन केले, तरच युवा पिढी अधिक सक्षम होईल. मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. सुभाष केंद्रे यांनी प्रास्तावितक केले. याप्रसंगी डॉ. आत्माराम आंधळे व डॉ. आर. व्ही. लष्के यांनीही मनोगत व्यक्त केले.

