लक्षवेधी : सकरमाउथ कॅटफिशची डोकेदुखी
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत प्रशासनाने आक्रमक (इन्व्हेसिव्ह) माशांच्या (Suckermouth Catfish) संवर्धन, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे.

– नित्तेंन गोखले
Suckermouth Catfish : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत प्रशासनाने आक्रमक (इन्व्हेसिव्ह) माशांच्या (Suckermouth Catfish) संवर्धन, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे. या माशांच्या यादीत सकरमाउथ कॅटफिशचाही समावेश आहे. हा मासा का आणि कसा धोकादायक ठरत आहे, यावर नजर टाकूयात.
सकरमाउथ कॅटफिश (Suckermouth Catfish) हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीतला. या माशावर चिलखतासारख्या कडक पट्ट्या असल्याने त्याला ‘हेलिकॉप्टर फिश’ किंवा ‘आर्मर्ड फिश’ (चिलखती मासा) असेही म्हटले जाते. जगभरातील मत्स्यप्रेमींकडून सकरमाउथ कॅटफिशच्या प्रजातींचे मत्स्यालयात (अॅक्वेरियममध्ये) पालन केले जाते. पण आजकाल अनेक देशांसाठी हा मासा एक मोठी समस्या बनला आहे. दुर्दैवाने, भारतही या देशांच्या यादीत समाविष्ट आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक नद्या व धरणाच्या जलाशयात, पूर्व कोलकाता येथील वेटलँड्समध्ये, तसेच आंध्र प्रदेशच्या कृष्णा-गोदावरी नद्यांमध्ये सकरमाउथ कॅटफिशमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याच्या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. माशांच्या ‘पीटेरिगोप्लिचथिस पार्डलिस’ आणि ‘पी. डिसजंक्टिव्हस’ या दोन प्रजातींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पण हे विदेशातील मासे भारतीय नद्या आणि जलाशयांपर्यंत कसे पोहोचले? याचे उत्तर सोपे आहे. जेव्हा हे मासे अॅक्वेरियमच्या टाक्यांसाठी खूप मोठे होतात, तेव्हा लोक त्यांना सरळ कसलाही विचार न करता नद्या आणि इतर जलस्रोतांमध्ये सोडून देतात.
माशाची आक्रमक वृत्ती
सकरमाउथ कॅटफिश माशांना जलाशयांसाठी धोकादायक का मानले जाते? अमेरिका, मेक्सिको, भारत आणि फिलिपिन्समध्ये सकरमाउथ कॅटफिशमुळे जलस्रोत, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक जलचर जीवसृष्टीवर होणार्या अनेक हानिकारक परिणामांची नोंद आहे. सरकारसमोर याबाबत अनेक अभ्यास अहवालही सादर केले गेले आहेत.
सागरी जीवशास्त्रज्ञ सांगतात, की सकरमाउथ कॅटफिश इतर प्रजातींच्या माशांनी घातलेली अंडी खातात आणि पाण्यातील अन्नसंसाधनांसाठी त्यांच्याशी स्पर्धा करतात. त्यामुळे ज्या ठिकाणी सकरमाउथ कॅटफिशची संख्या वाढू लागते, तिथे स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. या माशांच्या शरीरात हाडांची संख्या जास्त असून त्यांची त्वचा टणक असते.
त्यांच्यात मऊ मांस कमी असल्यामुळे ते मानवी आहारासाठी पसंत केले जात नाहीत. तसेच, त्यांच्या अंगावरील कडक आणि काटेरी भागांमुळे इतर मासेही त्यांना खात नाहीत. त्यांची प्रजनन क्षमता अधिक असून ते एकाच वेळी शेकडो अंडी घालतात. यामुळेच सध्या भारतातील लहान तलावांपासून ते नद्या आणि धरणांपर्यंत सर्वत्र मोठ्या संख्येने हे मासे आढळून येतात.
सकरमाउथ कॅटफिशच्या काही प्रजाती अंडी घालण्यासाठी नदीच्या मऊ काठांवर छोटी बिळे खणतात. अशा बिळांमुळे नदीकाठ कमकुवत होऊ शकतो, माती अस्थिर होते आणि काही ठिकाणी नैसर्गिक जलमार्गांमध्ये अडथळा निर्माण होतो. या माशांचे पर (फिन्स) कडक व काटेरी असतात आणि त्यांच्या अंगावर खडबडीत आवरण असते. ते अनेकदा मासेमारांच्या जाळ्यांमध्ये अडकतात आणि गुंततात. त्यांना बाहेर काढण्यासाठी जाळी फाडण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
थोडक्यात, सकरमाउथ कॅटफिशमुळे (Suckermouth Catfish) मासेमारी करणार्या समुदायांना आर्थिक फटका बसतो. भारतीय बाजारपेठेत या माशांना मागणी आहे का? अनेक अहवालांवरून असे दिसून येते की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सकरमाउथ कॅटफिश माशांची संख्या गेल्या सहा वर्षांत वाढली आहे.
मात्र, मासेमारांच्या जाळ्यात हे मासे ज्या दिवशी अडकतात, तो दिवस त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरतो. त्याचे कारण असे आहे की या माशांना बाजारात जवळपास काहीच मागणी नाही. भारतात केवळ मोजकेच खत उत्पादक, माशांचे तेल उत्पादक, तसेच, चामड्याच्या वस्तू आणि पशुखाद्य तयार करणारे व्यावसायिक या माशांची खरेदी करतात.
स्थानिक पातळीवर उपाययोजना
या माशाचा उपद्रव रोखण्यासाठी भारतात काय उपाययोजना आहेत? भारताच्या शोभिवंत माशांच्या आयात विषयक नियमावलीनुसार, हानिकारक आणि आक्रमक प्रजातींच्या आयातीवर बंदी आहे. म्हणूनच थेट बंदी नसली तरी सकरमाउथ कॅटफिशची आयात करणे कठीण आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (एनबीए) सकरमाउथ कॅटफिशचा (पीटेरिगोप्लिचथिस पार्डलिस प्रजातीचा) समावेश आपल्या आक्रमक प्रजातींच्या मूल्यांकनात आणि दस्तऐवजांमध्ये केला आहे. केरळ, गोवा आणि ओडिशासारखी राज्ये आक्रमक प्रजातींच्या संख्येवर लक्ष ठेवतात. त्यापैकी काही राज्ये आक्रमक माशांचे बेकायदेशीर साठे कारवाई दरम्यान जप्त करतात.
अॅक्वेरियममधील मासे नदी-नाल्यांत सोडण्यापासून लोकांना रोखण्यासाठी राज्य सरकारे स्वयंसेवी संस्थांसोबत हात मिळवून जनजागृती मोहीमही राबवतात. गैर-सरकारी संस्थांनी उजनी धरण (महाराष्ट्र), पूर्व कोलकाता पाणथळ प्रदेश आणि आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या कृष्णा-गोदावरी नदी परिसरात या माशांच्या नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. परंतु या उपाययोजना राज्यांच्या विशिष्ट भागांमध्येच लागू आहेत. सध्या तरी या समस्येवर देशस्तरीय किंवा राज्यस्तरीय धोरण लागू नाही.
कौतुकास्पद बाब म्हणजे महाराष्ट्र सकरमाउथ कॅटफिशच्या धोक्याबाबत जागरूक आहे. राज्यात या वर्षी सोलापूरसह विविध भागांमध्ये सकरमाउथ कॅटफिशच्या प्रजननावर, विक्रीवर आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु चिंताजनक बाब म्हणजे मोठ्या संख्येने हे मासे भारतातील जलाशयांमध्ये आधीच पसरले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील उजनी धरणाच्या जलाशयात मासेमारी करणार्यांनी मार्च 2026 ते जुलै 2026 या कालावधीत तब्बल 35 टन सकरमाउथ कॅटफिश पकडल्याचे वृत्त आहे.
ठोस पावले उचलण्याची गरज
मत्स्योद्योगाचे रक्षण करण्यासाठी या उपाययोजना पुरेशा आहेत का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. जागतिक मत्स्योत्पादनात (Suckermouth Catfish) भारताचा वाटा साधारणपणे आठ टक्के इतका आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची सागरी खाद्यपदार्थांची (सीफूड) निर्यात 73 हजार कोटी रुपयांच्याही पलीकडे गेली. भारत हा मत्स्योत्पादनातील जगातील दुसरा सर्वात मोठा देश असून, तीन कोटींहून अधिक लोक मत्स्यव्यवसायात गुंतलेले आहेत.
याशिवाय, आणखी काही दशलक्ष लोक या उत्पादनांच्या प्रक्रिया आणि वाहतुकीच्या कामात कार्यरत आहेत. त्यामुळे, जर आक्रमक प्रजातींच्या प्रसारावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर त्याचे गंभीर पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात, हे नक्की.






