लक्षवेधी : सायबर दरोड्यांचा ‘चक्रव्यूह’
एपीजीच्या अहवालातून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, सायबर फसवणूक (Cyber Fraud) ही तांत्रिक किंवा बँकिंग क्षेत्राशी जोडलेली साधी समस्या नाही, तर ती मानवी तस्करी आणि अवैध आंतरराष्ट्रीय पैशांचे एक अत्यंत गंभीर संकट आहे.

– नरेंद्र क्षीरसागर
Cyber Fraud : एपीजीच्या अहवालातून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, सायबर फसवणूक (Cyber Fraud) ही तांत्रिक किंवा बँकिंग क्षेत्राशी जोडलेली साधी समस्या नाही, तर ती मानवी तस्करी आणि अवैध आंतरराष्ट्रीय पैशांचे एक अत्यंत गंभीर संकट आहे.
सध्याच्या डिजिटल युगात सायबर फसवणूक ही एखाद्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे करणे किंवा ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळणे एवढ्यापुरती मर्यादित असल्याचा अनेकांचा समज आहे; पण प्रत्यक्षात या गुन्ह्यामागे मानवी तस्करी, सक्तीची मजुरी, बनावट कंपन्या, म्युल बँक खाती, क्रिप्टोकरन्सी आणि हवाला यांचे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय आंतरराष्ट्रीय जाळे उभे राहिले आहे.
आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लाँडरिंग म्हणजेच ‘एपीजी’च्या ‘सायबर स्कॅम (Cyber Fraud) हब्स अँड ह्युमन ट्रॅफिकिंग’ या अलीकडील अहवालात या गुन्हेगारीची अत्यंत भीषण आणि मानवी बाजू उजेडात आणली आहे. दक्षिण-पूर्व आशियातील विविध सायबर स्कॅम केंद्रांमध्ये नोकरीच्या शोधात असणार्या सुशिक्षित तरुणांना आकर्षक नोकर्यांचे आमिष दाखवून बोलावले जाते.
परदेशात पोहोचल्यानंतर त्यांच्याशी फसवणूक करून त्यांचे पासपोर्ट आणि मोबाइल फोन जप्त केले जातात. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवून ऑनलाइन गेमिंग, रोमान्स स्कॅम, गुंतवणूक फसवणूक, फेक लोन आणि डिजिटल अरेस्ट यांसारखे गंभीर सायबर गुन्हे करण्यास जबरदस्ती केली जाते. कंबोडियातील सिहानोव्हिल आणि पोइपेट, म्यानमारच्या म्यावादी आणि श्वे कोक्को तसेच लाओसचा गोल्डन ट्रँगल परिसर हे या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचे प्रमुख केंद्र बनले आहेत.
भारताच्या गृह मंत्रालयाने देखील संसदेमध्ये या सर्व ठिकाणांचा सविस्तर उल्लेख करून नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. खरे पाहता सिहानोव्हिल हे एकेकाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात होते; परंतु मोठ्या प्रमाणावर झालेल्या चिनी गुंतवणुकीमुळे याचे रूपांतर एका ‘स्कॅम सिटी’मध्ये झाले आहे. येथे अनेक आलिशान हॉटेल्स आणि कॅसिनोचे रूपांतर आता गजाआड असलेल्या ‘स्कॅम कंपाउंडस्’मध्ये झाले आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी करून आणलेल्या लोकांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून जगभरातील लोकांची ऑनलाइन फसवणूक करून घेतली जाते. हे शहर या गुन्हेगारीचे मुख्य केंद्र मानले जाते. पोइपेट हे कंबोडिया-थायलंड सीमेवर वसलेले शहर आहे. अलीकडच्या काळात या शहरातही सायबर गुन्हेगारीचे जाळे वेगाने पसरले आहे. येथेही अनेक मोठ्या इमारती आणि कंपाउंडस्मध्ये ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवले जातात.
या शहराचा वापर सीमावर्ती भाग असल्यामुळे गुन्हेगारांच्या (Cyber Fraud) हालचालींसाठी आणि तस्करीसाठी अधिक सोयीस्कर होतो. येथे मानवी तस्करी करून आणलेल्या मजुरांना शारीरिक आणि मानसिक छळ सोसून सक्तीने गुन्हेगारी कृत्य करायला भाग पाडले जाते. या पार्श्वभूमीवर परदेशात नोकरी स्वीकारण्यापूर्वी तेथील नियुक्ती संस्था आणि भर्ती एजंटची कायदेशीर वैधता आणि विश्वसनीयता कसून तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीत लुटलेली रक्कम सामान्यतः अत्यंत सुनियोजित मार्गाने फिरवली जाते. पीडित व्यक्तीकडून गेलेली रक्कम सर्वप्रथम ज्या खात्यात जमा होते, त्याला म्युल बँक खाते म्हटले जाते. या खात्याचा वापर गुन्ह्याची रक्कम गोळा करण्यासाठी आणि ती पुढे अन्यत्र वळवण्यासाठी केला जातो. हे म्युल खाते कधी कमिशन, कर्ज किंवा नोकरीचे आमिष दाखवून गरीब आणि भोळ्या लोकांच्या नावावर मिळवले जाते, तर कधी बोगस कागदपत्रे आणि बनावट कंपन्यांच्या नावावर उघडले जाते.
फसवणुकीची रक्कम वेगाने अनेक खात्यांमध्ये फिरवून तिची मूळ ओळख पूर्णपणे धुसर केली जाती. त्यानंतर पीयर-टू-पीयर सौद्यांमधून किंवा थेट व्यवहारांमधून दलालांच्या माध्यमातून त्याचे रूपांतर यूएसडीटीसारख्या स्टेबलकॉइन्समध्ये केले जाते. येथूनच खरी क्रिप्टो-हवाल्याची साखळी सुरू होते.
फसवणुकीची रक्कम प्रथम स्थानिक खात्यात येते आणि स्थानिक एजंट त्याद्वारे परदेशात असलेल्या त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये यूएसडीटी पाठवतो. मोबदल्यात तिथला हवाला व्यावसायिक स्कॅम केंद्राला डॉलर किंवा स्थानिक चलनात रोख रक्कम देतो.
या प्रक्रियेमुळे क्रिप्टोमधील पैसे अत्यंत वेगाने जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचवले जाऊ शकतात, तर हवाला यंत्रणा स्थानिक चलनात रोख पैसे उपलब्ध करून देते. तथापि, क्रिप्टोकरन्सीमधील प्रत्येक व्यवहार हा पूर्णपणे अदृश्य किंवा बेकायदेशीर नसतो. सार्वजनिक ब्लॉकचेनवर प्रत्येक व्यवहाराची नोंद अत्यंत सुरक्षित असते, ज्याच्या मदतीने तपास यंत्रणा संशयित वॉलेटस् आणि रकमेचा प्रवास अचूक शोधून काढू शकतात.
परंतु, गुन्हेगार अनेक वॉलेटस्, बोगस ओळख, परदेशी क्रिप्टो प्लॅटफॉर्म्स आणि रोख व्यवहारांचा एकाच वेळी एकत्रित वापर करतात तेव्हा गुंतागुंत निर्माण होते. परदेशातील क्रिप्टो एटीएम हे गुन्हेगारांना पैसे पाठवण्याचा आणखी एक सोपा मार्ग उपलब्ध करून देतात. या मशिन्समध्ये रोख रक्कम जमा करून बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी केली जाऊ शकते.
ठकसेन पीडितांना एक यूआरएल कोड पाठवतात आणि त्यांना क्रिप्टो एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यास सांगतात. रोख रक्कम जमा होताच ती क्रिप्टो थेट ठकसेनांच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होते. यामध्ये थेट बँक खात्याचा वापर होत नसल्यामुळे अंतिम लाभार्थ्याची ओळख पटवणे आणि रक्कम परत मिळवणे अत्यंत कठीण होऊन जाते.
तपासापासून वाचण्यासाठी गुन्हेगार ही रक्कम लहान-लहान भागांमध्ये वाटून टाकतात. यासाठी वेगवेगळ्या लोकांचा, क्रिप्टो एटीएमचा आणि डिजिटल वॉलेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे रक्कम पाठवणारे आणि अंतिम गुन्हेगार यांच्यामध्ये अनेक थरांची ढाल तयार होते.
तरीही, क्रिप्टो एटीएमद्वारे केलेल्या व्यवहारातून मशिनचे कॅमेरे, स्थान, मोबाइल नंबर, यूआरएल कोड आणि ब्लॉकचेनवर नोंद झालेल्या व्यवहारावरून महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागू शकतात. ज्या देशांमध्ये ग्राहकांची ओळख पटवण्याचे नियम आणि संशयित व्यवहारांची माहिती देण्याचे कायदे सौम्य आहेत, तिथे हा धोका अधिक प्रमाणात वाढतो.
भारतात म्युल खात्यांच्या समस्येला आळा घालण्यासाठी भारतीय सायबर अपराध (Cyber Fraud) समन्वय केंद्राने सात संयुक्त सायबर समन्वय टीमची निर्मिती केली आहे. यामध्ये हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, तेलंगणा, चंदीगड आणि आसपासच्या राज्यांसोबतच आंध्र प्रदेश, आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये या सायबर जाळ्याचे सक्रिय नेटवर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे.
म्युल खाती उघडण्यापूर्वीच त्यांची योग्य ती ओळख पटवणे आणि त्यांना वेळीच थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बँकांनी ग्राहकांच्या पत्त्याची, घोषित व्यवसायाची आणि बँक खात्याच्या वापराची अत्यंत कसून आणि सावधगिरीने तपासणी करणे गरजेचे आहे.






