पुणे – 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट असे म्हटले जाते. बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास 128 वर्ष जुना आहे. पण बॉक्सिंग डे याचा मुष्टियुद्धाशी काहीही संबंध नाही. अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या पुढच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला लोक आपला मित्र परिवार आणि नातेवाईकांना बॉक्समध्ये भेटवस्तू देतात. याच ख्रिसमस बॉक्सच्या नावावरून बॉक्सिंग डे टेस्ट असे नाव प्रसिद्ध झाले. 1892 साली शेफिल्ड शील्डचा एक सामना मेलबर्नवर खेळवला गेला. यानंतर व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात ख्रिसमसदरम्यान क्रिकेट खेळण्याची परंपरा सुरू झाली. मेलबर्नमध्ये 1980 च्या आधी 1952, 1968, 1974 आणि 1975 साली चार कसोटी सामने खेळले गेले. तसेच 1967, 1972 आणि 1976 मध्ये ऍडलेडवर बॉक्सिंग डे टेस्ट खेळवली गेली. 1975 साली क्वाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट पाहायला जवळपास 85 हजार प्रेक्षक आले होते. या कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट खेळवायला सुरुवात केली. बॉक्सिंग डे टेस्ट केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे तर, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेतही खेळवल्या जातात.