एएफसी ग्रासरुट दिवस उत्साहात साजरा

पुणे – शहरातील अस्पायर इंडियाने चिंचवड येथे एका स्थानिक विद्यालयाच्या सहकार्याने विशेष फुटबॉल शिबिराचे आयोजन करून एएफसी’ ग्रासरूट दिवस साजरा केला. संबंधीत शाळेच्या परिसरातच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात 65 विद्यार्थी उपस्थित होते.

भारतीय फुटबॉल महासंघाचा डी’ दर्जा असलेल्या अस्पायर इंडियाचे प्रशिक्षक निखिल नायर यांनी या एक दिवसीय शिबिरात मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी शाळेत गेली तीन वर्षे अशा मोहिमेत सहकार्य करणाऱ्या चार प्रशिक्षकांनी सहाय्य केले.

शिबिरात मुलांसह मुलींचाही सहभाग होता. यात विशेष करून 3 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांचा सहभाग होता. मुलांमध्ये लहानपणापासून खेळाविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांना कौशल्य दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अस्पायरच्या प्रशिक्षकांच्या नजरेखाली या मुलांनी विविध खेळांचे मार्गदर्शन घेतले. शाळेमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम घेण्यात आला होता. नव्वद मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमात मुलांनी ब्युटीफुल गेम’ असणाऱ्या फुटबॉल खेळातील नव्वद मिनिटांच्या पदन्यासाचे प्राथमिक धडे गिरविले.

वाढत्या उन्हाचा त्रास होत असूनही ही मुले फुटबॉलचा आनंद घेण्यात दंग झाली होती. कार्यक्रम केवळ नव्वद मिनिटांचा राहिला असला, तरी प्रत्येकाने मिळालेल्या प्रत्येक मिनिटाचा पुरेपूर आनंद घेतला. फुटबॉल खेळाविषयी अधिक कुतुहल त्यांच्या मनात नक्कीच निर्माण झाल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.