पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी; अंजली भागवत यांचे प्रतिपादन

पुणे : ‘पुण्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखवायला व्यासपीठ मिळणार आहे. यातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळणार आहे. या स्पर्धेतून काही खेळाडू पुढे देशाचे नेतृत्व करू शकतात,’ असे प्रतिपादन खेल रत्न पुरस्कार प्राप्त ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देऊन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सवा’ला आज, रविवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवाची सुरुवात मॅरेथॉनने झाली. स. प. महाविद्यालयाच्या मैदानात रविवारी झालेल्या पारितोषिक समारंभावेळी खासदार क्रीडा महोत्सवासाठीची ज्योत प्रज्वलन कार्यक्रम पार पडला.
यावेळी अंजली भागवत यांनी महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. ही ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी ऑलिंपियन, आशियाई पदक विजेते आणि सर्वच खेळातील माजी खेळाडू, प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते.
या वेळी व्यासपीठावर श्रीरंग इनामदार, रमेश विपट, सुरेखा द्रविड, गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, केदार जाधव, रेखा भिडे, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, मनोर एरंडे, शकुंतला खटावकर, आकांक्षा हगवणे, कौस्तुभ राडकर असे आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी आकाक्षात फुगे सोडून या स्पर्धेची सुरुवात केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘तरुण तंदुरुस्त राहिला, तर देश तंदुरुस्त राहील. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या पुण्याने देशाला अनेक खेळाडू दिले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील क्रीडा संस्कृतीचा प्रचार-प्रसार करायचा आहे.’ मोहोळ यांनी या वेळी मागे राहून हे व्यासपीठ खेळाडूंचे असल्याचे सांगून सर्व माजी खेळाडूंना पुढाकार घेण्यास सांगितले.
खासदार क्रीडा महोत्सव १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शहरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहेत. या क्रीडा महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांचा यात समावेश आहे.
या स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी आदी ठिकाणी होणार आहेत.




