सुदृढ पिढीसाठी खेळ आवश्यक आहे; सहाय्यक पोलिस आयुक्त युनूस शेख यांनी व्यक्त केले मत

शिरूर : दिवसेंदिवस मुले खेळापासून दूर होत असताना अधिकाधिक मोबाईलच्या आहारी जात असून यापासून परावृत्त करण्यासाठी व सुदृढ पिढी घडविण्यासाठी बालवयातच खेळ आवश्यक असल्याचे मत सहाय्यक पोलिस आयुक्त युनूस शेख यांनी व्यक्त केले. आंबळे(ता.शिरूर) येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त युनूस शेख यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,पूर्वीच्या काळी मोबाईल नसायचे तसेच खेळाची मैदाने उपलब्ध असायची.त्यामुळे मुले सतत खेळात मग्न असायची.त्यामुळे शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक विकास देखील होत होता.मात्र अलीकडील काळात पालकांचे मुलांकडे असणारे दुर्लक्ष,मोबाईलचे कमी वयात वेड,खेळाची मैदाने कमी,मुलांना खेळासाठी वेळ मिळत नसल्याने त्याचा शारीरिक विकासावर दूरगामी परिणाम होत आहे.मुलांना खेळाकडे आकर्षित करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दुर्गे, प्रा. कैलास खंडागळे यांनी मेहनत घेतली.यावेळी आमदार अशोक पवार,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, सरपंच सोमनाथ बेंद्रे,कुस्तीगीर संघाचे आप्पासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.जयदीप बेंद्रे,प्रदीप बेंद्रे यांनी आभार मानले.





