शिरूर : “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत सविंदणे गावात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या उपक्रमात महिलांची व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच उंची व वजन मोजणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसह महिलांना व तरुणींना आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत “पोषण आहार सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संतुलित आहाराचे महत्त्व, लहान मुलांचे व मातांचे पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच शुभांगी पडवळ, विद्यमान सरपंच मनिषा ताई नरवडे, उपसरपंच मालुबाई मिंडे, सोसायटीच्या चेअरमन शोभा लंघे, सोनाबाई मोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कोमल राठोड, आरोग्य निरीक्षक बलभीम पठारे, आरोग्य सेवक विनायक गोसावी, आरोग्य सेविका तेजवंती नैताम तसेच सर्व अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मान्यवरांनी “महिलांचे आरोग्य मजबूत राहिल्यास कुटुंब आणि समाज सशक्त होतो” असे सांगून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील महिलांनी आरोग्य तपासणीसह आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्याचे ठरवून शिबिराचा लाभ घेतला.