नेवासा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यास रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेवासा विधानसभेच्या होणाऱ्या निवडणूकीत उबाठा उमेदवाराच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचाच उमेदवार उभा रहाणार असून त्यासाठी शिवसैनिकासह पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना नेवासा विधानसभा निरीक्षक जेरी डेव्हिड यांनी नेवासा येथे रविवारी शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात बोलताना केले.
नेवासा येथील हॉटेल प्रणामच्या सभागृहात झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे हे होते तर जिल्हा प्रमुख नितीन औताडे,जिल्हा उपप्रमुख भगवानराव गंगावणे, महासंग्राम चे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे,शिवसेनेचे जिल्हा संपर्क बाळासाहेब पवार,शिवसेनेचे नवनिर्वाचित विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ,जेष्ठ विधी तज्ञ अँड. के.एच. वाखुरे,माजी खासदार तुकाराम गडाख यांचे चिरंजीव रविराज गडाख,युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख शुभम उगले,शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश डीके,शहर प्रमुख बाबा कांगुणे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश निपुंगे,शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख अँड.बापूसाहेब दारकुंडे राष्ट्रवादी अजित दादा गटाचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे,शिवसेना महिला आघाडीच्या सौ.शोभाताई आलवणे, पुष्पाताई मिरपगार,यशोदा थोपटे,मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन काळे शिवसेना कामगार सेनेचे राज्य सचिव नागेश तवटे,उपशहराध्यक्ष बंडू शिंदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना मेळाव्याचे संयोजक अँड.के.एच. वाखुरे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नेवासा तालुक्यात उबाठा उमेदवारापेक्षा सव्वा तीन हजार अधिक मते तालुक्यातील जनतेने सदाशिव लोखंडे यांना दिले असल्याने नेवासा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धनुष्यबाण हे चिन्ह नेवासा तालुक्याच्या घराघरात गेलेले असल्याने या मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार द्यावा तो अधिक मतांनी निवडून येईल अशी मागणी विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ यांनी यावेळी बोलताना केली.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार व जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे यांनी जिल्ह्यात घराघरात जाऊन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी राबविलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिवसैनिक झटून कामाला लागतील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांनी नेवासा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याने या विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार दिला जाईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की या मतदार संघात मला सव्वा तीन हजाराचा लीड तालुक्यातील मतदारांनी दिला आहे. येथील मतदार हा साखर पट्टयात असल्याने दहशतीखाली आहे,दहशत असली तरी तो झटके दिल्याशिवाय रहात नाही म्हणून या साखर पट्टयात शिवसेनेची ताकद निर्माण करून परिवर्तन करू, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जनतेच्या समस्याची जाण आहे. शासनाच्या सर्व हितावह योजना तळागाळात पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना शिवसेना विधानसभा निरीक्षक जेरी डेव्हिड म्हणाले की शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक हितावह योजना सर्वसामान्य माणसांसाठी व उपेक्षित घटकांसाठी राबविलेल्या आहेत. हया योजना आपण घरोघर जाऊन लोकांना सांगा त्या राबवा,लोकसभेच्या तालुक्यातील मिळालेल्या मताधिक्याने शिवसेनेची ताकद तालुक्यात वाढली असल्याने विधानसभेच्या निवडणूकीत येथील जागा नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करा. त्यासाठी प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करा प्रत्येक गावात कार्यकर्ता निर्माण करा त्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम मी करील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.तालुका प्रमुख सुरेश डीके यांनी आभार मानले.
मेळाव्याप्रसंगी नगरपंचायत सफाई कामगारांनी नगरपंचायतमध्ये कायम करण्यात यावे असे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी सोपविण्यात आले.तसेच नुकत्याच झालेल्या जळीतग्रस्त शिष्टमंडळाने निरीक्षक जेरी डेव्हिड यांची भेट घेऊन मुख्यमंत्री आपत्कालीन निधीतून मदत मिळवून देण्याची विनंती केली.जेरी यांच्या सह माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जळीत ग्रस्तांच्या दुकानांना भेटी दिल्या.लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी येणाऱ्या अडचणी यावेळी सांगितल्या या मेळाव्यास शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी, कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रसंगी शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या जाहीर करण्यात आल्या तर अनेक युवक व महिलांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.





