पक्ष फोडा, घर फोडा, आता प्रभाग फोडा; खासदार सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

पुणे – पक्ष फोडा, घर फोडा, आता प्रभाग फोडा… राज्य सरकार नुसते फोडाफोडीचे राजकारण करत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षांसह विरोधकांत अस्वस्थता असून, ही प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी आणि कुठल्याही राजकीय दबावाखाली होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
सुळे म्हणाल्या, की नागरिक हा प्रभाग रचनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे. निवडणूक जिंकणे हा केंद्रबिंदू असूच शकत नाही. ताकदवान लोकांनी उत्तम काम केले; पण त्यांचेच प्रभाग फोडले गेले आहेत. हे सरळसरळ मनमानीचे राजकारण आहे. राज्याच्या सत्तेतील मोठ्या पक्षाने अन्याय केला असून, सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अन्यायाविरोधात बोलणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कायद्यानुसार प्रभाग रचना झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, गणेशोत्सव काळामुळे ती १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असून, त्याबाबत पत्रही दिले जाईल. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.





