शहरांची बेसुमार वाढ रोखा, जीवनमान सुधारा

पुणे – जागतिकीकरणानंतर मुंबई पुण्यासह फक्त महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतभर वाढलेल्या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतातील शहरांच्या नियोजनाचे आराखडे आणि त्याची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य रीतीने न झाल्याने शहरांची बेसुमार वाढ होते आहे. परिणामी, शहरी जीवनमानाचा स्तर खालावत चालला आहे.
ही बाब लक्षात घेऊन शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत समृद्ध भारत अभियानाच्या माध्यमातून भविष्यातील सुनियोजित गावं आणि शहरांसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना जाहीरनामा पाठविण्यात येणार. उद्योजक नितीन ढेपे आणि ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या उपक्रमात राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, वास्तुविशारद डॉ. अविनाश सोवनी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पर्यटन क्षेत्रातील वसंत वसंत लिमये, पांडुरंग तावरे, पत्रकार संतोष देशपांडे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, लेखक आणि दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी सहभाग घेतला असून या सर्वांनी यावेळी या उपक्रमाची आपली भूमिका विशद केली.
या आहेत जाहीर नाम्यातील प्रमुख मागण्या
– शहरांसाठी लोकसंख्येची घनता निश्चित करावी.
– घनता ओलांडलेली आढळल्यास शहराच्या वाढीवर मर्यादा आणावी.
– शहरालगत नवीन स्वयंपूर्ण गाव, शहर निर्माण करावे.
– नवीन गावाचा विकास ५० वर्षांतील विस्ताराची शक्यता लक्षात घेऊन करावा.
– नवीन बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी पायाभूत सुविधा आधी निर्माण कराव्यात.
– रोजगार वाढीसाठी शहरांमधील औद्योगिक वसाहतींचे विकेंद्रीकरण करावे.
– वॉर्ड, प्रभाग स्तरावर स्थानिक क्षेत्र योजनेद्वारे नियोजन करावे.
– ट्रान्सपोर्ट एजन्सीजमध्ये समन्वय साधून शहरांच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचा रोडमॅप करावा.
– इमारतीमध्ये मुले व वयोवृद्धांच्या खेळ व मनोरंजन केंद्रासाठी संपूर्ण मजला राखीव ठेवावा.





