Pune District : राजगड तालुक्यात भात मळणीला वेग

वेल्हे : इंद्रायणी तांदुळासाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड तालुक्यामध्ये भात कापणी, झोडणी व मळणीला मागील १५ ते २० दिवसांपासून सुरुवात झाली असून या कामांना गती आली आहे. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून वर्षभरापासून घेतलेल्या मेहनतीचे चार पैसे हातात येणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तांदूळ खरेदीसाठी खरेदीदारांची वर्दळ तालुक्यात सगळीकडे वाढली आहे.
राजगड तालुक्यामध्ये इंद्रायणी, इंडम, हळवे बारीक, काळीसाळ, फुले समृद्धी ही मुख्य भात पिके तसेच गावरान नाचणी, वरई, वाल पावटा, हरबरा, काळा वाटाणा, गहू अशी उत्पादने भात पिकानंतर घेतली जातात. ही सर्व पिके पावसाच्या लहरी वातावरणावरच अवलंबून असून जर योग्य प्रमाणात पाऊस झाला तरच यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक असते. अन्यथा प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पावसाच्या या लहरी वातावरणाचा सामना करावा लागतो.
त्यामुळे अनेक लोक कामधंद्यानिमित्त विविध शहरांमध्ये जातात या ठिकाणची अनेक कुटुंबे ही पुणे, मुंबई, वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये चाकरमानी म्हणून काम करतात. अनेक महिला या घरकाम करतात तर बरेचसे युवक हे माथाडी कामगार व रिक्षाचालक आहेत. मात्र, पावसाची चाहूल लागताच ही सर्व मंडळी भात लावणीसाठी व त्यानंतर भात कापणीसाठी गावाकडे येतात.तालुक्याच्या प्रत्येक विभागांमध्ये पारंपारिक शेती बरोबरच आधुनिक पद्धतीने भात पीक घेतले जाते. प्रामुख्याने पाऊस पडल्यानंतर खाचरे नांगरणी, भात पेरणी, लावणी, कापणी व मळणी यासाठी विविध आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. त्यामध्ये नांगरणी व चिखल करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो तर भात लावणीसाठी व कापणीसाठी सुद्धा वेगवेगळी यंत्र वापरली जातात.
मळणी यंत्राद्वारे भाताची मळणी केली जाते. त्यामध्ये धान्य वेगळे व जनावरांसाठीचा चारा वेगळा केला जातो. यात सर्वाधिक मागणी ट्रॅक्टरला असते. लागणाऱ्या मजुरांची कमतरता लक्षात घेता या यंत्रांमुळे वेळ वाचतो परंतु ती वेळेवर उपलब्ध होत नाहीत. खरेदीदार तर भात कापणी झाल्यावर स्वतः साळ विकत घेतात आणि भात भरडून तो तांदूळ वर्षभरासाठी घेऊन जातात. यावर्षी सरासरी ६० ते ७० रुपये या दरम्यान किलोचा दर असून हात सडीचा तांदूळ १०० रुपये पेक्षाही जास्त दराने विकला जातो.
विशेष गुण:
•इंद्रायणी तांदूळ नैसर्गिक सुगंधामुळे पचनास सोपा आणि हलका वाटतो.
•तांदळाच्या सेंद्रिय प्रकारांमध्ये रासायनिक खतांचा वापर टाळल्यामुळे आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर.
•यामुळे इंद्रायणी तांदूळ हा पोषणमूल्यांनी भरलेला, चवदार, आणि आरोग्यपूर्ण तांदळाचा प्रकार मानला जातो.
इंधनाचे वाढलेले दर, वाहतूक खर्च तसेच रासायनिक व सेंद्रिय खतांचे वाढलेले दर यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. परंतु अनेक शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करतात त्यामुळे थोडाफार आर्थिक आधार त्यांना मिळतो. तशी भात शेती परवडणारी नाही आणि उत्पादन खर्चाच्या मानाने दर मिळत नाही.
– प्रा. मोहन रसाळ,स्थानिक शेतकरी गुंजवणे
मागील चार ते पाच वर्षांपासून माझे कुटुंबीय व काही नातेवाईक आणि मित्रमंडळी आम्ही जुना वेल्हे व आत्ताचा राजगड तालुका येथून इंद्रायणी तांदूळ खरेदी करीत आहे. याशिवाय इथे नाचणी वरई व इंद्रायणी तांदुळाची कणी म्हणजेच तांदुळाचा तुकडा खरेदी करण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी येतो. इंद्रायणी कणी अत्यंत चविष्ट असल्याने आम्ही प्रत्येक जण थोड्याफार प्रमाणात ती खरेदी करतो. दूध भाताची खरी मजा या कणीमध्ये आहे
– मनोहर आंबवले,सिंहगड रोड माणिकबाग





