गुगल डुडलच्या माध्यमातून भारताच्या ‘सॅटेलाईट मॅन’ उडुपी रामचंद्र राव यांना खास मानवंदना

नवी दिल्ली : गुगल नेहमीच आपल्या डुडलवरून चर्चेत राहते. आजही गुगलने असेच एक खास डुडल बनवले आहे. हे डुडल आहे भारताचे सॅटेलाईट मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतीय शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव यांचे. राव यांच्या जयंती दिनी हे डुडुल समर्पित करण्यात आले आहे.

प्राध्यापक राव यांचा आज जन्मदिवस आहे. 1975 मध्ये राव यांच्या नेतृत्वात भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला होता. भारतीय अंतराळ विज्ञानाच्या यशस्वी वाटचालीत प्राध्यापक राव यांचे मोलाचे योगदान आहे. अंतराळ विश्वाच्या बरोबरीने माहिती प्रसारण क्षेत्रातही राव यांचे मोठं योगदान आहे.

प्राध्यापक राव यांचा जन्म 10 मार्च 1932 रोजी कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातल्या अडामारू भागात झाला. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राव यांनी प्रतिभाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अंतराळ, उपग्रह प्रक्षेपण या क्षेत्रात नाव कमावले. प्राध्यापक राव हे इस्रोचे अध्यक्ष तसंच भारताचे अंतराळ सचिवही होते.आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अंतराळात सोडण्यात राव यांच्या नेतृत्वाखालील चमूने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. अंतराळात वीसहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करणं आणि त्यांचं आरेखन यामध्ये राव यांचा वाटा आहे.

2013 मध्ये सॅटेलाईट प्रोफेशनल्सने प्राध्यापक राव यांना सॅटेलाईट हॉल ऑफ फेम वॉशिंग्टनमध्ये सहभागी केले.आंतरराष्ट्रीय अस्ट्रोनॉमिकल फेडरेशनने राव यांचा समावेश प्रतिष्ठेच्या आईएएफ हॉल ऑफ फेममध्ये केला. अंतराळ विज्ञान क्षेत्रातील योगदानाकरता भारत सरकारने प्राध्यापक राव यांना 1976 मध्ये पद्मभूषण तसंच 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.24 जुलै 2017 रोजी 85व्या वर्षी प्राध्यापक राव यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.