Kumbh Mela Prayagraj : पुणे स्टेशनवरून कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे सेवा

पुणेः उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे जानेवारीत कुंभमेळा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशातून तसेच परदेशातून मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांचा कल पाहता रेल्वे विभागाच्या इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॅार्पोरेशनकडून ‘भारत गौरव’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरून १५ जानेवारी या दिवशी रात्री 10 वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेश येथील प्रयागराजच्या दिशेने रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत ‘भारत गौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि पुन्हा पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागने दिली आहे. या सात दिवसांच्या प्रवासात रेल्वेकडून विविध सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहे. तसेच या रेल्वेत प्रवाशांना सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, जेवण व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या या ठिकाणी उतरल्यानंतर तिथे त्यांची राहण्यासाठीची विशेष सुविधा देखील करण्यात येणार आहे.
पुणे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने नियोजन
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ८६ रेल्वे विविध मार्गांवरून धावल्या आहेत. विशेष म्हणजे धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. या योजनमुळे धार्मिक स्थळांबरोबर पर्यटनाचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. प्रयागराज येथील कुंभमेळाचे पर्व सुरू होत असून, पुणे आणि जिल्हा तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने या विशेष रेल्वे गाडीचे आयोजन करण्यात आले आहे.





