– अॅड. अभय छाजेड 7, 8 व 9 मार्च 2025 हे तीन दिवस पुण्यात ‘गांधी विचार साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. आज महात्मा गांधी यांच्या विचारांची खरंच गरज आहे. या निमित्ताने महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य, न्याय आणि समता यांचा पुरस्कार सत्य आणि अहिंसा मार्गाने करून महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या महामानवास मी वंदन करतो. जगातील वर्णवर्चस्वामुळे आणि साम्राज्यवादामुळे पारतंत्र्यात गेलेल्या अनेक देशांतील जनतेला नैतिक बळ मिळाले ते केवळ महात्मा गांधींमुळेच. विसाव्या शतकात जगात प्रभाव टाकणारे अनेक नेते होऊन गेले. त्यामध्ये चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन, हिटलर, माओ-त्से-तुंग, हो-चि-मिन्ह आणि महात्मा गांधी अशा थोर जागतिक नेत्यांमध्ये महात्मा गांधी यांचेच केवळ पुतळे सत्तरहून अधिक देशांमध्ये उभारले गेले, इतरांचे नाहीत. यावरूनच जागतिक पातळीवरील या महात्म्याचे महत्त्व लक्षात येते. आपल्या देशात येणारा प्रत्येक परदेशी राष्ट्रप्रमुख नवी दिल्लीत राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या स्मारकापाशी श्रद्धासुमने अर्पित करतो. ही बाब जगामध्ये महात्मा गांधींबद्दल असणारा आदरच दर्शवते. जगातील हजारो ग्रंथालयांना व प्रमुख चौक व रस्त्यांना महात्मा गांधींचे नाव दिले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, रशिया, चीन, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, स्पेन, पोलंंड, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे अशा अनेक देशांनी महात्मा गांधींचे पुतळे उभारून त्यांची स्मृती जतन केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर म्हटले, ‘माझ्यासारखी कृष्णवर्णीय व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होऊ शकते ते केवळ महात्मा गांधींनी उभारलेल्या वर्णविद्वेषीविरोधी चळवळीमुळेच! कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांनी 1994 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक स्वीकारताना म्हटले की, ‘मला मिळालेल्या शांततेच्या नोबेल पुरस्काराबद्दल मी महात्मा गांधींचा ऋणी आहे. तेच माझे ‘रोल मॉडेल’ आहेत.’ सार्या जगाला वंदनीय महात्मा गांधींचा पुतळा पाकिस्तानमध्ये मात्र एकाही सार्वजनिक ठिकाणी नाही. इस्लामाबादमधील संग्रहालयात बॅ. जीनांसमवेत महात्मा गांधींचा पुतळा आहे, तेवढाच! मध्यंतरी वॉशिंग्टनमध्ये खलिस्तानवाद्यांनी महात्मा गांधींचा पुतळा विद्रूप केला. ही निषेधार्हच बाब होती. महात्मा गांधींच्या चित्रावर गोळ्या झाडणे अथवा मारेकर्याचे उदात्तीकरण करणे असे विकृत प्रकार येथेही घडले आहेत. असे पुतळे विद्रूप करून अथवा उखडून त्या महात्म्याचा विचार दबला जात नाही, हे मात्र सत्य आहे, असो. महात्मा गांधींबद्दलचा आदर आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच दि. 7, 8 व 9 मार्च 2025 यादिवशी पुण्यातील कोथरूड भागातील गांधीभवन येथे ‘गांधी विचार साहित्य संमेलन’ आयोजित होत आहे. या संमेलनात महात्मा गांधींच्या विचारांचा जागर होईल. यातून नवचैतन्य निर्माण होऊन महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसा या उदात्त विचारांचा उद्घोष सर्वत्र दुमदुमत राहील, हे नक्की. (अॅॅड. अभय छाजेड, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)