विशेष : सरोवरांची तहान!
जागतिक सरोवर दिन (World Lake Day) हा सरोवरे, तलावांचे संरक्षण करण्यासाठी आणि गोडे पाणी पुरवण्यामधील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

– डॉ. श्रीकांत कार्लेकर
World Lake Day : जागतिक सरोवर दिन (World Lake Day) हा सरोवरे, तलावांचे संरक्षण करण्यासाठी आणि गोडे पाणी पुरवण्यामधील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…
जगभरातील लोकांना सरोवरे (World Lake Day) या महत्त्वाच्या जलस्रोतांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सरोवर दिन हा दिवस स्थापित केला आहे.
पृथ्वीवरील पृष्ठभागावरील 90 टक्क्यांहून अधिक द्रव गोडे पाणी सरोवरांमध्ये (World Lake Day) साठवलेले आहे. ही सरोवरे अनेक प्रकारचे मासे, वनस्पती आणि वन्यजीवांना राहण्यासाठी सुरक्षित जागा पुरवतात आणि तलाव पृथ्वीला थंड ठेवण्यास आणि हवामानाचा समतोल राखण्यासाठी कार्बन साठवण्यास मदत करतात.
सरोवर म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खार्या पाण्याचा मोठा साठा असलेले प्रदेश. जमिनीवरील सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. सरोवरे आणि तळी (तलाव) यांत फरक असतो. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी व खोल असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ आणि शांत असते. सरोवरांच्या किनार्यावर वार्यामुळे लाटा फुटताना दिसतात.
नैसर्गिक सरोवरे (World Lake Day) ही सिंधूतडाग किंवा लॅगुन्सपेक्षा वेगळी असतात. प्रत्येक सरोवराचे विशिष्ट असे एक पाणलोट क्षेत्र असते. त्यांत येणार्या पाण्याचे व त्यातून निर्गमित होणार्या पाण्याचे प्रवाह, अन्नघटक, विरघळलेला प्राणवायू, प्रदूषके, पाण्याचा सामू म्हणजे पी.एच. आणि त्यातील गाळ संचयन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात.
प्रत्येक सरोवरात नदी किंवा ओहोळ स्वरूपात पाणी बाहेर निर्गमित करणारा एक तरी जलप्रवाह असतोच. नद्या प्रवाही असतात तर सरोवरांना वाहते पाणी येऊन मिळते. नैसर्गिक सरोवरे सामान्यपणे डोंगराळ भागांत, खचदर्यात आणि हिमप्रदेशात दिसून येतात. काही सरोवरे नद्यांच्या मार्गातच तयार होतात तर काही बारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन गेलेल्या हिमयुगातील अनियमित नदी प्रणालीत आढळून येतात.
सगळी नैसर्गिक सरोवरे हळूहळू गाळाने भरून जात असतात आणि पाणी साठवण्याची त्यांची क्षमताही कमी होत असते. त्यामुळे भूशास्त्रीय कालखंडाचा विचार करता ती अल्पकालीन आणि अल्पजीवी असतात असे म्हणता येते. काही सरोवरे कृत्रिम असतात आणि ती विविध उद्योग, शेती किंवा जलविद्युत निर्मिती, घरगुती पाणी वापर आणि केवळ त्यांच्या सौंदर्यानुभवासाठीच बनविली जातात.
सरोवरे आणि तळी यात जो नेमका फरक आहे त्याविषयी अनेक मते आहेत. मात्र, सरोवरे ही आकार आणि खोली या बाबतीत तळ्यांपेक्षा मोठी असतात याबद्दल एकमत असल्याचे दिसून येते. सरोवरांचा कमीत कमी आकार 2 ते 8 हेक्टर (.02 ते .08 वर्ग किमी) असतोच. तळी यापेक्षा लहान असतात. हा विचार अर्थातच नेहमी केला जात नाही व आपण सरोवराला तळे किंवा तळ्याला सरोवर म्हणून मोकळे होतो.
जगाच्या कानाकोपर्यातील अनेक सरोवरे आणि तळ्यांच्या जलाशयात देवदेवता किंवा भूत पिशाच्यांचे वास्तव्य असल्याच्या आख्यायिका विशेषतः तळ्यांच्या बाबतीत सगळीकडे ऐकविल्या जातात. याच भीतीमुळे बरीच तळी आणि सरोवरे आजही माणसाच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित राहिली आहेत असेही दिसून येते.
जगात असलेल्या सरोवरांपैकी जास्त सरोवरे गोड्या पाण्याची असून ती उत्तर गोलार्धात, ध्रुवीय व समशीतोष्ण कटिबंधात आहेत. असे असले तरी जगातील अशा जलाशयांपैकी 91 टक्के सरोवरे नसून तलाव किंवा तळी आहेत! या उरलेल्या 9 टक्क्यांतील सरोवरातही जास्त संख्या लहान आकारांच्या सरोवरांची आहे. मोठी सरोवरे संख्येने खूपच मर्यादित आहेत. अशा सर्व प्रकारच्या सरोवरांची निर्मिती ही विविध प्रकारच्या नैसर्गिक प्रक्रियांतून होत असते आणि त्यानुसार त्यांचे विविध प्रकारही तयार होतात.
भूविवर्तनी सरोवरे : पृथ्वीकवचाच्या उभ्या व आडव्या हालचालीमुळे, खचण्यामुळे किंवा वलीकरणामुळेही तयार होतात. मध्य आफ्रिकेतील खचदरीत असलेली अशी सरोवरे जगातील सर्वात मोठी सरोवरे आहेत. कास्पियन आणि अरल समुद्र, आपले नैनिताल ही भूविवर्तनी सरोवरे आहेत.
ज्वालामुखीय सरोवरे : यांना ज्वालामुखीय कुंड किंवा महाकुंड सरोवरे असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर दगड धोंडे, लाव्हा बाहेर पडून किंवा ज्वालामुखीच्या माथ्यावरचा मुखाचा भाग खचून ती तयार होतात. काही वेळा ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा नदीप्रवाह अडवतो व त्यामुळेही सरोवरे तयार होतात.
हिमानी सरोवरे : हिमनद्यांच्या उगम प्रदेशांत आणि प्रवाहात विविध कारणांनी बर्फ वितळून किंवा अडवले गेल्यामुळे तयार होतात.
विलयन सरोवरे : जगात अनेक ठिकाणी चुनखडक विरघळून मोठमोठे खड्डे पडतात आणि त्यात पाणी साठून ही सरोवरे बनतात.
या मुख्य प्रकारांबरोबरच जगभरात, धबधब्यांच्या पायथ्याशी, नदीपात्रातील नागमोडी वळणामुळे किंवा गाळसंचयनामुळे, भूस्खलनामुळे, उल्कापात आघातामुळे सरोवरे तयार होतात. मणिपूर राज्यातील ‘लोकटाक’ सारखी गाळाची तरंगती बेटे असलेली जगावेगळी सरोवरेही दिसून येतात. समुद्रकिनारे, वाळवंटे, चुनखडकातील गुहा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही सरोवरे आढळून येतात.
सरोवरांमुळे पूरपरिस्थितीत आणि दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे मोठे संचय म्हणून माणसाला नेहमीच मदत होते. त्यांच्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील भूजल पातळीही वाढते. सरोवरांना मोठा ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा असतो. ती जलीय प्राणी आणि वनस्पती यांच्यासाठी जीवनदायी असतात. उभयचरांच्या प्रजननासाठीही ती महत्त्वाची ठिकाणे असतात. त्यामुळे जनमानसांत या जलाशयांबद्दल आदराची भावना असल्याचे दिसून येते.
मिशिगन-ह्युरॉन सरोवर, सुपिरियर सरोवर, कॅस्पियन समुद्र, सायबेरियामधील बैकल सरोवर, तिबेटमधील मानसरोवर, टिटिकाका सरोवर, कच्छमधील नारायण सरोवर, कर्नाटकातील पंपा सरोवर, राजस्थानातील पुष्कर सरोवर अशी अनेक उल्लेखनीय नैसर्गिक सरोवरे पृथ्वीवर आहेत. संपूर्ण भारतभर लहानमोठे अनेक तलाव आणि सरोवरे आहेत परंतु योग्य देखभाल न झाल्यामुळे यापैकी कितीतरी जलाशयांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
19व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी भारतभर मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या दर्शनिका तयार केल्या त्यामध्ये अनेक मोठ्या सरोवरांचा व तलावांचा उल्लेख मिळतो. तळ्यांच्या आणि सरोवरांच्या नावामागेही काहीतरी अर्थ किंवा आख्यायिका असतात हेही त्यातूनच कळले. कोल्हापूर हा शब्द मूळ कोल्लापूर या कानडी शब्दावरून बनला आहे. यातील कोल्ल या शब्दाचा अर्थ आहे तळे. रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, पद्माळा अशी अनेक तळी इथे आहेत म्हणून हे तळ्यांचे शहर.
अशी ही सरोवरे सध्या अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. आजकाल कचरा, रसायने आणि खते अनेक तलावांमध्ये वाहून जात असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. हे पदार्थ तलावातील आणि सरोवरातील पाण्याला मोठी हानी पोहोचवत असल्याचे दिसून येते आहे. शेती आणि शहरांसाठी यातील पाण्याचा जास्त प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे ती कोरडी पडत आहेत.
सध्याच्या जागतिक तापमान वाढीमुळे अनेक सरोवरातील (World Lake Day) पाण्याची अधिक वेगाने वाफ होते आहे. तलावांच्या आजूबाजूला बेकायदेशीर बांधकामे झाल्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ कमी होत आहे.
यामध्ये बेलंदूर तलाव (कर्नाटक), हुसेन सागर (तेलंगणा), दल सरोवर (जम्मू आणि कश्मीर), आंचल सरोवर (जम्मू आणि कश्मीर) आणि वेंबनाड सरोवर (केरळ) यासारख्या सरोवराचा समावेश होतो.27 ऑगस्टच्या जागतिक सरोवर दिनी सर्वांनीच सरोवरांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. तरच वैविध्य असलेले आणि जनमानसात आदराचे स्थान असलेले हे पृथ्वीवरचे अतिशय सुंदर असे भूरूप सुरक्षित राहील.






