दखल : कृत्रिम पावसाचा विसर
अशा परीस्थितीत सरकारने कृत्रिम पावसाच्या (Artificial Rain) पर्यायावर प्राधान्याने विचार करावयास हवा. मात्र, सरकारी पातळीवर याबाबत विचारसुद्धा होत नसल्याचे विदारक आणि संवेदनहिनतेचे प्रदर्शन करणारे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

– बाबासाहेब निमसे
Artificial Rain : सरकारने कृत्रिम पावसासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. 24 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारमधील कोणीही कृत्रिम पावसाबाबत (Artificial Rain) काहीच बोलत नाहीत.
पॅसिफिक महासागरातील एल निनो आता अधिक तीव्र होत असून, राज्याला कमी पावसाचा, अनियमित हवामानाचा आणि अनेक भागांमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभाग, स्कायमेट यासारख्या संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात पावसाची तूट आणखी वाढणार आहे. त्यामुळे कृषीक्षेत्र आणि पाण्याच्या ताणाबाबत चिंता आणखीच वाढली आहे.
अशा परीस्थितीत सरकारने कृत्रिम पावसाच्या (Artificial Rain) पर्यायावर प्राधान्याने विचार करावयास हवा. मात्र, सरकारी पातळीवर याबाबत विचारसुद्धा होत नसल्याचे विदारक आणि संवेदनहिनतेचे प्रदर्शन करणारे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
एल निनोचा अत्यंत तीव्र परिणाम म्हणजे यावर्षी पावसाचे अत्यंत असमान वितरण पाहावयास मिळत आहे. राज्यातील जवळजवळ सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी चांगला पाऊस झाल्याचे दिसून येते. त्या तुलनेत उर्वरित भागात मात्र पावसाने एकतर हुलकावणी दिल्याचे दिसते किंवा अत्यल्प प्रमाणात तो बरसल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण विभाग आणि विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी बर्यापैकी पावसाची नोंद असली तरी अवर्षणाचा सामना करणार्यांमध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यांची उदाहरणे प्रातिनिधिक स्वरूपात घेता येतील.
बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला असून मुळा धरणात 95 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा पोहोचला आहे. भंडारदरा धरण, निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे. नगरच्या पाण्यावरच अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 93 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.
कोयना, उजनी या धरणांचा पाणीसाठादेखील समाधानकारक आहे. या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांचा शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता वर्षभरासाठी सुटला आहे. शेतकर्यांसाठी धरणांमधून पाण्याची आवर्तने सुरू झाली आहेत. त्यामुळे त्या भागातील सर्वांचीच चिंता संपली आहे. उर्वरित जिल्हा मात्र पाण्यासाठी अक्षरश: तडफडताना पाहायला मिळतो आहे.
अपुर्या पावसावर शेतकर्यांनी सोयाबीन, मका, मूग, कांदा, उडीद या पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र आता या पेरणीवर पावसाने मोठे संकट ओढावले आहे. दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहतो, मात्र पाऊस पडत नाही. शेतातील (Artificial Rain) सर्वच पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीन आता फुलात येऊ लागले आहे. आता उशिरा पाऊस झाल्यास उत्पादनात मोठी घट किंवा अजिबातच न पडल्यास 100 टक्के नुकसानाची भीती आहे.
जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. अनेक गावांची तहान टँकरच्या पाण्याने भागवावी लागत आहे, अशा परिस्थितीत सरकारने ‘कृत्रिम पावसाचा’ पर्याय स्वीकारायला हरकत नाही. मात्र, सरकारच्या पातळीवर त्याबाबत अक्षरश: सामसूम आहे.
कोणताही उच्चपदस्थ अधिकारी, कृषी अधिकारी, कृषिमंत्री, पशुखात्याचे मंत्री, अन्य मंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्या कोणाच्याही ही बाब लक्षात येत नाही. सरकारने कृत्रिम पावसासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करून 24 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोणीही त्याबाबत बोलत नाही.
कृत्रिम पावसाचा पर्याय महागडा असला तरी शेतकर्यांचे होऊ घातलेले करोडोंचे नुकसान, अमूल्य पशुधन यापेक्षा किमती निश्चितच नाही. धरणे भरली म्हणून सरकार निवांत आहे. पण ही त्यांची मोठी घोडचूक ठरू शकते. कारण अर्धा महाराष्ट्र अवर्षणाला सामोरा जात आहे. दुष्काळाचे मोठे संकट घोंगावत आहे. पावसाळा फक्त महिनाभर राहिला असून आता यासाठी उशीर करणे सरकारलाच महाग पडू शकते.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांची बाष्पक्षमता, तापमान, वार्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक परिणाम करतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी (Artificial Rain) एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. याच कणावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरित्या थांबते, तेव्हा ती कृत्रिमरित्या घडवून आणावी लागते.
यालाच कृत्रिम पाऊस म्हटले जाते. त्यासाठी काळ्या ढगांवर (सोडियम क्लोराइड) मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषण्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढत जातो आणि तेच बाष्प पावसाचे थेंब बनून खाली पडते. एकदा क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते.
पावसाचा प्रयोग यशस्वी होईलच याची शाश्वती नसते, रसायन फवारले (Artificial Rain) आणि वार्याने तो ढगच दूर निघून गेला तर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे प्रयोग करायचाच नाही हे तर उद्या आपण मरणारच आहोत, म्हणून आज जगायचेच कशाला? असे म्हणण्यासारखे होईल.






