विशेष : पाणी वाचवा जग वाचवा

– रमेश लांजेवार
अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरी पाण्याच्या अभावी अपुर्या आहेत. पाणीच नसेल तर जीवसृष्टी फार काळ तग धरू शकणार नाही. पाणी वाचवा तरच जग वाचेल.
22 मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला. 1992 मध्ये पर्यावरण व विकास या विषयावर संयुक्त राष्ट्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळेस जागतिक जल दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली व संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रत्येक वर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. 1993 मध्ये 22 मार्च रोजी संपूर्ण जगात जागतिक जल दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
जागतिक जल दिनाला पाणी वाचविण्याचा संकल्प दिवसही म्हटले जाते. जगाच्या भूभागाचा विचार केला तर या पृथ्वीतलावर 70 टक्के पाणी व 30 टक्के भूभाग आहे. तरीही जगात पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते. आज संपूर्ण जगात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामागचे मुख्य कारण म्हणजे बदलते हवामान व जगातील वाढती लोकसंख्या. कारण जगातील 50 टक्के जंगलसंपदा मानवाच्या अतिरेकामुळे नष्ट झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते सरळ समुद्रात जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस समुद्राची पातळीही वाढत आहे. समुद्राची पातळी वाढणे म्हणजेच पृथ्वीतलावरील संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पाण्याचा विषय साधा नसून अत्यंत गंभीर आणि चिंतेचा आहे.
दूषित वातावरणामुळे व तापमानामुळे अनेक हिमकडे कोसळताना आपण पहातो. यामुळे संपूर्ण जगात महाप्रलय, त्सुनामी आल्याचेही आपण पाहिले आहे. अनेकदा देवभूमीतील महाप्रलय हा हिमकडा कोसळल्याने आलेला आहे. मानवाच्या अतिरेकामुळे हिमकडे वेगाने वितळायला लागले तर पृथ्वीतलावर भीषण परिस्थिती निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर पाणी वाचविण्यासाठी तळागाळातून प्रयत्न व्हायलाच पाहिजे. सध्या जगामध्ये आग लागण्याच्या घटना व वणवे लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक मोठमोठी जंगले अजूनही जळत आहे.कारण मानवाने जमिनीच्या पोटातील पाणी संपूर्णतः आटवून टाकले आहे.जगातील अनेक भागांत ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होताना आपण पहातो.
भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीचा उद्रेक या संपूर्ण घटना पृथ्वीतलावर पाण्याची पातळी कमी होत असल्याने होत आहे. भूगर्भात पाणी योग्य प्रमाणात टिकून राहिले असते तर ज्वालामुखी, त्सुनामी, महाप्रलय, भूकंप, वणवे इत्यादी विनाशकारी घटनांचा उद्रेक झाला नसता. अजूनही मानवजातीला पाण्याचे महत्त्व समजल्याचे दिसून येत नाही. पूर्वी नदी, ओढे, तलाव, झरा व विहिरीतून पाणी मुबलक मिळायचे; परंतु आता नदी, तलाव व विहिरी आटत आहेत. पाण्याचा दुष्काळ पाहता 50 ते 60 फुटांपर्यंतचे विहिरीचे पाणी आटल्याचे दिसून येते. त्यामुळे आता मानवजातीला बोरवेलचा सहारा घेऊन 500 ते 700 फुटांवर पाण्यासाठी जावे लागत आहे. मनुष्याला पाण्याचा अधिकार फक्त 50 ते 60 फुटांपर्यंतच होता. परंतु मानवाने पाण्यासाठी संपूर्ण सीमा ओलांडून पाताळात जाऊन तेथील पाण्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते. म्हणजेच मानवाने सापाच्या बिळात हात टाकला आहे. ज्या पाण्यावर मानवजातीचा तिळमात्र अधिकार नाही तेही पाणी आपण आपली तहान भागवण्यासाठी वापरत आहोत. हा मानवाचा निसर्गसृष्टीवर खुला अन्याय व अत्याचार नाही काय?
अनेक देश अणुचाचण्या करीत आहेत. अशा परीस्थितीत पृथ्वी भूगर्भात पाण्याचा साठा कशी करेल? मानव आज आगीशी खेळत आहे त्यामुळे तो पाण्याचे महत्व विसरल्याचे दिसून येते. ही कठीण परिस्थिती पाहता जगाने युद्धाचा नव्हे तर पाणी वाचविण्याचा संकल्प करायला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा आवश्यक आहे यात दुमत नाही, परंतु अन्न, वस्त्र, निवारा पाण्याशिवाय अपुरा आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आज जगातील वाढत्या पाण्याच्या समस्यांमुळे अनेक पशुपक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते. पर्यावयण व निसर्ग सुरक्षित तर पाणी सुरक्षित. पाणी सुरक्षित तर मानव, पशुपक्षी, जीव-जंतू सुरक्षित, जीवसृष्टी सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. असे भाकीत आहे की 2040 मध्ये भारतात प्यायला पाणी मिळणार नाही. अशी स्थिती येऊ शकते हे नाकारता येत नाही. संयुक्त राष्ट्राने जगातील पाण्याच्या स्थितीच्या अहवालामध्ये ही भीती वर्तवली आहे. जगात पुढे पाण्याचे भीषण संकट येणार असून भारत या संकटाच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जगापुढे शुद्ध पाण्याचीसुद्धा गंभीर समस्या आहे. नद्या, सरोवरे, तलाव यामध्ये उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. कारखान्यातील दूषित पाणी व सांडपाणी पिण्याच्या पाण्यापासून कोसो दूर ठेवण्याची गरज आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे जगात दरवर्षी लाखोच्या संख्येने मनुष्य हानी व पशुपक्ष्यांची हानी होताना दिसून येते.
आताही 80 टक्के पाणी प्रदूषित आहे. पाण्याच्या स्रोतांचे होणारे प्रदूषण आणि पाणी साठविण्यासाठी नसलेले नियोजन यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास येणार्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी भीषण होऊ शकते, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांचे दिला आहे. एक वर्षात पावसाचे पाणी अडविता आले तर पाच वर्षे पुरेल इतका पाणीसाठा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अजूनही आपल्याला जमलेले नाही. लक्षात ठेवले पाहिजे की पाणी संपले तर आपणही संपू. त्यामुळे प्रत्येकाने पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे आणि कृती केली पाहिजे तेव्हाच पाणी वाचेल. त्याचप्रमाणे ‘पाणी वाचवा जग वाचवा’ हा निर्धार संपूर्ण जगाने अंगीकारला पाहिजे. आजपासूनच प्रदूषण रोखण्याचा व पाणी वाचविण्याचा निर्धार केला पाहिजे.





