– प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण छत्रपती शिवराय यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर जन्म झाला. छत्रपती शिवरायांची जिद्द, पराक्रम, व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य आजही प्रेरणा देतं. शिवजयंतीच्या निमित्ताने हा विशेष लेख… छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा, कुशल शासक आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांनी जीवनभर धर्म, संस्कृती, स्वराज्य आणि स्वतंत्रतेसाठी लढा दिला. ते दूरदर्शी आणि लोकहितवादी राजे होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाला स्वाभिमानाची नवी जाणीव करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं राज्य हे सर्वसामान्य लोकांचं होतं. या राज्यात कोणालाही हीन वागणूक दिली जात नव्हती. शिवराय हे महाप्रतापी तर होते त्याचसोबत ते उत्तम प्रशासकही होते. छत्रपती शिवाजी महाराज व धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये सगळ्याच धर्माचे व सर्व जातीचे लोक होते. पण त्यांनी कधीही लोकांमध्ये धर्मावरून मतभेद केले नाहीत. त्यांनी नेहमीच सर्व धर्मांना समान वागणूक दिली. रयतेला त्यांचा धर्म, त्यांचे रितीरिवाज पाळण्याची मुभा त्यांनी दिली होती. खरं तर शिवरायांचा काळ लक्षात घेता छत्रपती शिवरायांचं हे धोरण आणि त्यांचे विचार अनन्यसाधारण असेच होते. कारण, त्यावेळच्या लोकांवर धर्माचा मोठा पगडा होता. पण आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ आणि उच्च असतो अशीच त्यांची शिकवण असे. प्रत्येक धर्माच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्यांचा उद्देश हा एकच असतो हे महत्त्वाचं तत्त्व छत्रपती शिवरायांनी मांडलं होतं. छत्रपती शिवराय व रयत शत्रू आक्रमण करून मोठ्या प्रमाणावर रयतेच्या शेतीचं, धान्याचं नुकसान करत असत. त्यामुळे शत्रूच्या आक्रमणापासून शेतकर्यांचं आणि शेतीचं संरक्षण करणं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनाचं एक प्रमुख सूत्र होतं. अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, दिल्लीची मोगलशाही, सिद्दी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज अशा अनेक शत्रूंशी संघर्ष करत शिवाजी महाराज आपलं स्वराज्य उभारत होते. अशा परिस्थितीत शत्रूंच्या वारंवार स्वार्या होत असत. अशा स्वार्यांमध्ये सर्वात जास्त संकट रयतेवर आणि रयतेच्या पिकांवर कोसळत असे. भरलेल्या पिकामध्ये घोडदळ सोडून पीक उद्ध्वस्त केलं जात असे. तसंच भरदिवसा गावे लुटली जात असत. लहान-थोरांना क्रूरपणे ठार केलं जात असे. बालक आणि महिलांवर अत्याचार केले जात असत. या सार्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच लढा दिला. प्रत्येक संकटामधून शिवरायांनी रयतेला नेहमीच बाहेर काढलं आणि या क्रूर लोकांपासून संरक्षण दिलं. छत्रपती शिवरायांच स्वराज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. पाणी व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही ठराविक भागात, काही जिल्ह्यात वारंवार, काही जिल्ह्यात तर सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. जर शिवकालीन उपाय आजच्या काळात दुष्काळावर अंमलात आणले तर नक्कीच दुष्काळाची भीषणता कमी होईल. शिवकाळात अनेक वेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पण जलसंधारणाचं आणि पाण्याच्या वापराचं महत्त्व महाराजांनी ओळखलं होतं. शेतीचे दुष्काळामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल यासंबंधी त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. शेतीला उपलब्ध असलेलं पाणी आणि जमिनीची प्रतवारी करण्याचे प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केले होते. गडकिल्ल्यांसाठी पाणीसाठे निर्माण करण्याचं आणि त्याचा वापर करण्याचं तंत्र त्यांना अवगत होतं. छत्रपती शिवाजी महाराज व गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व, युद्धनीती आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात गडांचं, किल्ल्यांचं महत्त्व ओळखून महाराष्ट्रात अनेक गडकोटांची निर्मिती केली. जलदुर्ग बांधून स्वराज्याचे आरमार निर्माण केले. आरमार भक्कम केले. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक गड तर अक्षरशः शेवटची घटका मोजत आहेत. किल्ल्यांवर अनेक ठिकाणी घाण केली जाते. खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तिथे टाकल्या जातात किंवा अयोग्य वर्तन केलं जातं. हे सारं चुकीचं आहे. काही लोक तर गडांवर जाऊन दारू पिणं, धिंगाणा घालणं या सारखेही प्रताप करतात. छत्रपती शिवरायांच्या या ऐतिहासिक वास्तूंचा अपमान होणार नाही, या वास्तूंचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. कारण, आजच्या आपल्या पिढीने या गडकिल्ल्यांचं संवर्धन व संरक्षण केलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीला हा अमूल्य ठेवा पाहताही येणार नाही. हेच गड-किल्ले पुढच्या पिढींना पराक्रमाची, ध्येयाची प्रेरणा देतील. किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी सामान्य लोकांनी पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत.