विशेष : शिक्षणाची ज्योती

– प्रा. डॉ. सुभाष राठोड
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्याचा मार्ग मिळाला. समाजकारण क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडून आले. त्यांच्या जयंतीनिमित्ताने…
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी झाला. स्त्रीशिक्षणाच्या कार्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाईंनी वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्या शाळेत विनावेतन अध्यापनाचे कार्य करण्यास प्रारंभ केला. त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या. त्या काळात मुलींना शिक्षण देण्यासाठी सामाजिक मान्यता नव्हती.
सावित्रीबाईंना अनेकदा समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले. लोक त्यांच्यावर अक्षरशः शेण-दगडगोटे, वीट फेकत, शिव्याशाप देत. पण सावित्रीबाईंनी या दुर्लक्ष करून आपले कार्य अविरत सुरू ठेवले. सुरुवातीला अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले अशा ब्राह्मण, धनगर आणि मराठा जातीतील मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला. काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली आणि सावित्रीबाईंवर शेणमाती फेकली. तरीही त्या मागे हटल्या नाहीत.
1851 मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यात आणि रास्ता पेठेतील मुलींच्या शाळा स्थापन केल्या. 10 सप्टेंबर 1853 रोजी जोतीरावांनी त्यांच्या काही सहकार्यांसह अस्पृश्यांना विद्या शिकविण्याकरिता मंडळी अशी संस्था स्थापन केली. या उपक्रमात त्यांना सगुणाबाई क्षीरसागर यांची मोलाची साथ मिळाली. सगुणाबाई आणि फातिमा शेखदेखील मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करू लागल्या.
त्याचप्रमाणे विष्णुपंत थत्ते आणि वामनराव खराडकर या ब्राह्मण मित्रांनी देखील या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. जोतीरावांचे एक अत्यंत जवळचे मित्र असलेले उस्मान शेख यांची भगिनी फातिमा होत्या. 1849 मध्ये फुले दांपत्याला गृहत्याग करावा लागला तेव्हा उस्मान शेख यांनी मदत केली. आपल्या राहत्या घरातील एक भाग फुले दांपत्यास राहण्यासाठी देऊन त्यांना आश्रय दिला.
1863 मध्ये जोतीराव आणि सावित्रीबाईंनी गंजपेठेतील आपल्या राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्यांचा विचार करून ‘बालहत्या प्रतिबंधकगृहा’ची स्थापना केली. 1884 पर्यंत विविध भागांमधून सुमारे 35 निराश्रित स्त्रिया तेथे राहावयास आल्या. अशा स्त्रियांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वतः पार पाडत. त्यांपैकी काशीबाई नावाच्या एक ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत यास फुले दांपत्याने दत्तक घेतला.
त्याने पुढे वैद्यकीय शिक्षण घेत डॉक्टर होऊन फुले दांपत्याच्या समाजसेवेच्या कार्याची धुरा उचलली. या दांपत्याच्या कार्यामुळे प्रेरित होऊन 1875 साली पंढरपूर येथे तेथील दुय्यम न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर यांनीसुद्धा बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. जोतीरावांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी जलसे, साहित्य, भाषणे, वृत्तपत्रे यांसारख्या विविध साधनांद्वारे समाजात जागरूकता निर्माण केली, ज्यामुळे या चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रभर पसरला.
सत्यशोधक विवाहपद्धतीत ब्राह्मण पुरोहिताशिवाय आणि हुंडा न घेता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा एक नवीन पर्याय समाजास दिला. याचे उदाहरण म्हणजे सावित्रीबाईंच्या मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबणकर यांची कन्या राधा आणि सत्यशोधक कार्यकर्ता सीताराम जवाजी आल्हाट यांचा अशा पद्धतीचा पहिला विवाह सावित्रीबाईंनी स्वखर्चाने घडवून आणला. या वेगळ्या विवाहामुळे त्यांना अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर 4 फेब्रुवारी 1889 रोजी फुले दांपत्यांचा दत्तक मुलगा यशवंत आणि ग्यानोबा ससाणे यांची कन्या राधा ऊर्फ लक्ष्मी यांचा विवाहदेखील याच पद्धतीने झाला, जो एक आंतरजातीय विवाह होता.
त्या काळात विधवांचे केशवपन ही एक क्रूर प्रथा अस्तित्वात होती. जोतीराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी नाभिकांना एकत्र करून विधवांचे केशवपन न करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे एक हजार नाभिकांनी संपात भाग घेतला. या क्रांतिकारक आंदोलनामागे सावित्रीबाई फुले यांचीच प्रेरणा होती. या आंदोलनाचे वृत्त 9 एप्रिल 1890 रोजी लंडनच्या ‘द टाईम्स’ वृत्तपत्रात प्रकाशित झाले आणि इंग्लंडमधील सुधारक चळवळीतील स्त्रियांनी सावित्रीबाईंना अभिनंदनाचे पत्र पाठवले.
28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे दत्तकपुत्र यशवंत यांना अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी विरोध केला, परंतु सावित्रीबाईंनी धैर्याने आणि निर्धाराने जोतीरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक पाऊल ठरले. जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची जबाबदारी स्वतः घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. 1893 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षपदाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली.
सावित्रीबाई प्रतिभावंत लेखिका आणि कवयित्री होत्या. 1854 मध्ये त्यांचे ‘काव्यफुले’ (काव्यसंग्रह) आणि 1892 मध्ये बावनकशी, सुबोध रत्नाकर असे तीन ग्रंथ प्रकाशित झाले. ‘जा, शिक्षण मिळवा’ या त्यांच्या कवितेत त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. खरे तर सावित्रीबाईंचे साहित्य कित्येक वर्षे महाराष्ट्राला ज्ञात नव्हते. डॉ. मा. गो. माळी यांनी 1988 मध्ये ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाद्वारे त्यांचे साहित्य उजेडात आणले.
महिलांच्या हक्कांसाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली.
जातीय भेदभाव किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भेदभावास त्यांचा ठाम विरोध होता. भ्रूणहत्याविरुद्धही त्या कार्यरत होत्या. फुले दांपत्याचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदान देण्याची घोषणा केली. सावित्रीबाईंनी ‘गृहिणी’ या मासिकात काही लेखही लिहिले. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
एकोणिसाव्या शतकात बहुजन समाज धर्म, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरेच्या जंजाळात गुलामगिरीत अडकला होता. या परिस्थितीला विरोध करणारी सावित्रीबाईंची लेखणी प्रकटली. 1856 मध्ये जोतीराव फुले यांच्या भाषणांचे संकलन प्रकाशित झाले तसेच सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली पत्रे आणि त्यांच्या भाषणांचेही प्रकाशन झाले. या लेखनातून उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसन आणि कर्ज यांसारख्या मुद्द्यांवर विचार मांडले आहेत. दारू, जुगार आणि वेश्यागमन यासारख्या वाईट गोष्टी पुरुषांच्या दुराचाराचे कारण बनतात आणि त्यामुळे त्यांना यापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. ही साथ रोखण्यासाठी सावित्रीबाईंनी आपला जीव धोक्यात घालून प्लेगपीडित रुग्णांची सेवा केली. सेवा बजावत असताना सावित्रीबाईंना प्लेगचा संसर्ग झाला. समाजसेवेत संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाईंना अखेर मृत्यूने गाठले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.





