– प्रा. डॉ. सुभाष राठोड नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या थोर शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेलेली आहेत, त्यात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला जातो. त्यांची आज जयंती. सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या छोट्या गावात 12 मार्च 1913 रोजी जन्मलेले यशवंतराव लहानपणापासूनच संघर्षशील आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले, परंतु आई विठाबाईंच्या कणखर संस्कारांमुळे त्यांनी कठीण परिस्थितीवर मात केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. तर उच्चशिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. पुण्यात त्यांनी बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांच्यावर महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या विचारांचा प्रभाव पडला. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात ते भूमिगत राहून ब्रिटिशांविरुद्ध लढले. स्वातंत्र्यानंतरही त्यांची ही ज्वाला कायम राहिली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या घडणीसाठी स्वतःला वाहून घेतले. महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणण्याचे श्रेय यशवंतरावांकडे जाते. त्यांचे प्रयत्न आणि लोकचळवळीच्या बळावर अखेर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. 1948 मध्ये ते काँग्रेसचे चिटणीस झाले. 1952 नंतर स्थानिक स्वराज्य संस्था व पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक राज्याचे आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणतात. त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि कार्यक्षमता पाहून 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या काळात पंडित नेहरूंनी त्यांच्यावर संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. चिनी आक्रमणानंतर संरक्षण दलात नवचैतन्य निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘परकीय अक्रमणाच्यावेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला’ असे त्यांच्याबद्दल जे गौरवोद्गार काढले जाते ते सार्थच आहे. त्यांनी गृहखाते यशस्वीरीत्या सांभाळले. अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. बांगलादेशचे युद्ध, दुष्काळ यामुळे खालावलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी चालना दिली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय ते अर्थमंत्री असतानाच घेतले गेले. चलनवाढीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे धोरण देखील त्यांच्याच काळात आखण्यात आले. देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. पुढील काळात देशाचे उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. देशात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. यशवंतराव चव्हाण हे काही काळ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षसुद्धा होते. महाराष्ट्राचे भाग्यविधाते, कार्यक्षम मंत्री, प्रभावी संसदपटू आणि उदारमतवादी नेते म्हणून त्यांची जनमानसात प्रतिष्ठा निर्माण झाली. संपन्नता ही कष्टातूनच निर्माण होते; परंतु तिचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, या समतोल विकासाच्या तत्त्वज्ञानावर दृढ विश्वास ठेवून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्राने औद्योगिकीकरणाच्या दिशेने भक्कम पावले टाकली. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची उभारणी झाली आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीला नवे परिमाण प्राप्त झाले. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास गतिमान करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध औद्योगिक धोरणे राबवली. औद्योगिक वाढीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी सहकार चळवळीला नवी दिशा व बळ दिले. साखर कारखाने, सहकारी बँका आणि गृहनिर्माण संस्था यांच्या स्थापनेस त्यांनी सक्रिय प्रोत्साहन दिले. परिणामी, सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहिला आणि ग्रामीण समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला ठोस आधार मिळाला. यशवंतराव हे साहित्य, कला आणि संस्कृतीचे प्रबोधक होते. त्यांना मराठी भाषेचा अतिशय अभिमान होता. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठी भाषेच्या सन्मानासाठी अनेक धोरणे राबवली. मराठी भाषेचे अस्तित्व टिकले पाहिजे, कारण ती आपल्या अस्मितेची ओळख आहे. या विचाराने त्यांनी मराठी साहित्य संमेलनांना मदत केली. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ स्थापन केले. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते अभिजात साहित्यिकही होते. राजकारणाच्या धावपळीत असूनही त्यांनी साहित्यावर प्रेम कायम ठेवले. साहित्य, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, वैचारिक व समीक्षणात्मक लेखन आदी विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. कृष्णाकाठ, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, विदेश दर्शन आणि सह्याद्रीचे वारे या ग्रंथांतून त्यांच्या लेखनप्रतिभेचा परिचय होतो. राजकारणात सक्रिय असूनही ते चिंतनशील रसिक व सामाजिक विचारवंत राहिले. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा नेता गमावला. मात्र, आजही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरतात.