22 जानेवारीला 34 हजार मंदिरांमध्ये होणार विशेष पुजा ! कर्नाटक सरकारच्या स्थानिक प्रशासनाला सुचना

नवी दिल्ली – कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने आपल्या राज्यातील ३४ हजार मंदिरांना २२ जानेवारी रोजी विशेष पुजा कार्यक्रम आयोजित करण्याची सुचना केली आहे. त्या दिवशी अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे, त्यानिमीत्ताने कॉंग्रेस सरकारने ही सुचना जारी केली आहे.
कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, राम मंदिराचे श्रेय घेण्याबद्दल भाजपवर निशाणा साधला, ते म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राम मंदिर उघडण्यासाठी पावले उचलली होती. हे भाजपचे लोक खोटे आहेत. त्यांना खोटे बोलणे आणि लोकांना मुर्ख बनवणे याशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नाही.
कॉंग्रेस सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रीया देताना भाजपने म्हटले आहे की रामाचे अस्तित्वच नाकारणाऱ्या कॉंग्रेसला त्या दिवशी मंदिरांमध्ये पुजा करण्याचा आदेश द्यावासा वाटणे हीच प्रभु रामचंद्रांची ताकद आहे.
तत्पूर्वी, अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याबाबत मात्र अजून कॉंग्रेस नेत्यांनी निर्णय घेतलेला नाही.





