पाटण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींना विशेष पॅकेज

कोयनानगर – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 90 पैकी तब्बल 64 ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून चोख उत्तर दिले, हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजकीय उठावाच्या भूमिकेला लोकमान्यता मिळून राजमान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज यांच्या या देदिप्यमान कामगिरीसाठी पाटण मतदारसंघातील 64 ग्रामपंचायतींना तातडीने विशेष पॅकेज देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाटण मतदारसंघातील जनतेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही दिलेली अनोखी भेट असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
पाटण मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमात ते ऑनलाइन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, डॉ. दिलीपराव चव्हाण, विजय पवार, सुरेश पानस्कर, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, सोमनाथ खामकर, नामदेवराव साळुंखे, शशिकांत निकम, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, विजय पवार, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे, संजय देशमुख, भरत साळुंखे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, जालंदर पाटील, मनोज मोहिते,नाना साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, विकासकामांबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सदैव सहकार्य असून सातारा जिल्ह्याला विकासनिधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
“राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे गटाला चपराक द्या’
ना. शंभूराज देसाई म्हणाले, “”एका वेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये या निवडणूका झाल्या. आमच्या निर्णायानंतर आदित्य ठाकरे यांचा दौरा सातारा जिल्ह्यात मल्हारपेठ याठिकाणी झाला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाला अभूतपुर्व यश देऊन पाटण तालुक्यातील जनतेने त्यांना धोबीपछाड दिली आहे.” ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने मिळवलेल्या यशाचा ट्रेंड आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे गटाला चपराक बसवा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्याना केले.





