विशेष : जैवविविधतेसाठी हत्तींची गरज!

– प्रा. विजय कोष्टी
12 ऑगस्ट रोजी जगभरात हत्तींचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजनांचे आदानप्रदान व्हावे या दृष्टीने ‘जागतिक हत्ती दिन’ साजरा केला जातो.
निसर्ग संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय महासंघ, (आययूसीएन)च्या लाल यादीत म्हणजे धोकादायक स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आशियाई हत्तींचा समावेश करण्यात आला आहे. आशियातील अनेक देशांत हत्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सध्या जगात सुमारे 40 हजार आशियाई हत्ती असून त्यापैकी सुमारे 75 टक्के हत्ती भारतात आहेत. भारतासाठी हत्ती हा नैसर्गिक वारसा प्राणी आहे. मूल्यवान हस्तीदंतासाठी हत्ती नेहमीच शिकार्यांचे बळी ठरतात. जसा विकासाचा वेग वाढत गेला तसे आशिया आणि आफ्रिकेतील हत्तींचे जीवन धोक्यात आले. जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा संवेदनशील प्राणी अस्तित्वात राहणे गरजेचे आहे.
विविध संस्कृतीमध्ये हत्तीला शक्ती, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. जीवशास्त्रज्ञांच्या मते, हत्ती हे अत्यंत समजूतदार प्राणी असून मानवाप्रमाणे कुटुंबवत्सल असतात. काही प्रसंगी तर ते नात्यांबाबत मानवापेक्षाही जास्त प्रामाणिक आणि समजूतदार असल्याचे सिद्ध झाले असून हत्ती वर्षानुवर्षे नातेसंबंध आणि अनुभव विसरत नाहीत. वनरक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व लॉरेन्स एन्थोनी यांचे दक्षिण आफ्रिकेतील जुलू लैंडच्या सत्यकथेवर आधारित विख्यात पुस्तक ‘द एलिफंट व्हीस्फर’मधील एक प्रसंग हत्तींच्या नाती जपण्याच्या आणि संवेदनशीलतेबाबत जीवशास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकणारा आहे.
हत्ती आणि लॉरेन्स यांच्यातील नात्याचे वर्णन याठिकाणी यथोचित आहे. दक्षिण आफ्रिकेतील जुलू लैंड भागातील लोकांनी जंगली हत्तींच्या त्रासाला कंटाळून लॉरेन्सला हे हत्ती त्याच्या अभयारण्यात नेण्यास सांगितले. पण ते तेथे थांबेनात. या कळपाच्या जुन्या नेत्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने नवीन नेता ‘नाना’ आपले काम समजून घेत होता. दररोज रात्री हे हत्ती तटबंदी (बांध) तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत. दररोज रात्री नाना जेव्हा बांध तोडण्यास येई, तेव्हा लॉरेन्स मोठ्याने ओरडून, बोलून धोक्याची सूचना देत असे. हा दिनक्रम बरेच दिवस चालल्यानंतर एका रात्री नाना ने बांध तोडण्याचा प्रयत्न न करता आपली सोंड लॉरेन्सच्या खांद्यावर ठेवली. तिला कळून चुकले की, ही व्यक्ती आपली हितचिंतक आहे. हळूहळू त्यांच्यातील दोस्ती वाढत गेली. हत्तींनी आता लॉरेन्सच्या अभयारण्याला आपले घर मानले. या घटनेनंतर तेरा वर्षांनी लॉरेन्सचे हृदयविकाराने निधन झाले. कित्येक मैल अंतरावरील हत्तींना ही बातमी समजली आणि तो सर्व कळप अनेक तासांचा प्रवास करून लॉरेन्सच्या घरी पोहचला आणि तेथे दोन दिवस थांबून शोक व्यक्त केला. संशोधकांना हत्तींचे हे वर्तन अनाकलनीय वाटले, विशेषतः लॉरेन्सच्या मृत्यूची बातमी हत्तींना कशी समजली?
हत्तींचे सरासरी आयुर्मान 70 ते 75 वर्षांचे असून, सर्वात बुजुर्ग हत्तीण कळपाचे नेतृत्व करते. तिच्या अनुभव आणि ज्ञानाने कळपाची वाटचाल चालते. नर हत्तींचे काम बहुधा प्रजननापुरतेच मर्यादित असून कळपामध्ये मादी हत्ती आणि पिल्लांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पिल्लांचे संगोपन करण्याची जबाबदारी मुख्यत्वे आजी-पणजीकडे असते. हत्तींचे संदेशवहन अद्भु असते. विविध प्रकारचे आवाज, झाडांशी घर्षण, चित्कार याद्वारे ते वेगवेगळे संदेश देतात. शास्त्रज्ञांना अभ्यासातून अशा प्रकारचे 70 विविध संदेश मिळाले आहेत. काही वेळा आवाज इतका हळू असतो की तो मनुष्यास ऐकता येत नाही. ते कमी वारंवारीतेचे अल्ट्रासाउंड तरंग असतात. सुमारे 100 वर्ग किलोमीटर क्षेत्रातील आपल्या सहकार्यापर्यंत ते आपला संदेश विनासायास, कोणत्याही तंत्राविना पोहचवू शकतात. एखाद्या हत्तीचा मृत्यू झाल्यास कळपातील सर्व हत्ती त्याच्या भोवती शांतपणे बसून आपला शोक व्यक्त करतात. काही वेळा, ते झाडांची पाने आणि माती टाकून प्रेत झाकून टाकतात.
कळपातील एखादा हत्ती तणावग्रस्त असल्यास इतर हत्ती विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून जसे की, सोंडेने त्याला स्पर्श करून त्यांचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतात. पिल्लांचे पालनपोषण करण्यासाठी तरूण हत्तीण आजीला मदत करतात. रागरंग (मूड) ठीक असेल तर हत्ती एकमेकांशी खेळतात. चेष्टा-मस्करी करतात. कळपातून चालतानाही त्यांच्या काही विशिष्ट पद्धती असतात. सर्वात पुढे कळपाचे नेतृत्व करणारी सर्वात अनुभवी हत्तीण, त्यानंतर इतर हत्तीण, पिल्ले आपल्या आईच्या मागे मागे कळपाच्या मध्यभागी असतात. संकटाच्या वेळी हत्ती आक्रमक न होता विचारपूर्वक निर्णय घेतात. नेतृत्व करणारी हत्तीण सुरक्षित मार्ग अवलंबून संकटाचा सामना करत कळपाचे रक्षण करतात.
जैव-विविधतेसाठी जंगलामध्ये हत्तींचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असून जुनी, वठलेली झाडे, वनस्पती बाजूला सारून नव्या वनस्पतींना जागा करून देण्यात हत्तींचे योगदान महत्त्वाचे असते. हत्तींच्या विष्टेतील घटक वनस्पती, झाडांच्या उत्पत्तीसाठी मदत करतात. दुष्काळाच्या वेळी हत्ती नदीकिनारी जमीन खोदून पाणी काढतात आणि आपल्याबरोबरच इतर प्राण्यांचीही तहान भागवितात. जंगलामध्ये हत्तींनी तयार केलेले रस्ते इतर जीव-जंतूंना उपयुक्त ठरतात. म्हणूनच मानवाने हत्तींशी मानवतेने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे, असे वाटते.





