विशेष : रुपयाचा प्रश्न मांडणारे अर्थतज्ज्ञ

– प्रा. समीर ठाकूर
सध्या भारतीय रुपया डॉलरच्या प्रमाणात निचांकी पातळीवर घसरला आहे. रुपयाचा प्रश्न आणि त्यावर उपाय सांगितला आहे अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकरांनी. आज त्यांच्या जयंतीनिमित्त…
बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल सामान्यत: सर्वसामान्यांना कमी माहिती आहे. अर्थशास्त्रातील आपल्या योगदानाद्वारे त्यांनी तीन पदव्या प्राप्त केल्या. ‘ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवहार’ हा शोधनिबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठात एमएच्या पदवीसाठी पूर्ण केला होता. ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती’ हा त्यांचा प्रबंध पीएचडीसाठी त्यांनी कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. या ग्रंथाला सेलिग्मन यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनेत सेलिग्मन म्हणतात, ‘या विषयाचा इतका सखोल, सांगोपांग अभ्यास अन्य कोणी केल्याचे आपणास माहीत नाही’. यावरून त्या ग्रंथाचे महत्त्व व मौलिकता लक्षात येते.
अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांवर दोन घटनांचा विशेष परिणाम झाला. एक, अमेरिकन राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी 14वी घटनादुरूस्ती. दोन, अमेरिकेतील निग्रो लोकांचा उद्धार करता बुकर टी. वॉशिंग्टन यांचा मृत्यू. ‘रुपयाचा प्रश्न : उत्पत्ती आणि उपाय’ हा डॉ. आंबेडकरांनी 1922 मध्ये डीएससी (डॉक्टर ऑफ सायन्स) पदवीसाठी, ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये सादर केला होता. त्याच वेळेस ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. आपल्या सखोल अध्ययनाद्वारे त्यांनी स्वतःची मते आपल्या प्रबंधात निर्भीडपणे मांडली होती. रुपयाच्या मूल्यात घट का होत आहे? आणि त्यासाठी सरकारने योजलेले उपाय रुपयाचे मूल्य का सावरू शकत नाहीत? याचे सखोल अध्ययन त्यांनी आपल्या प्रबंधात केले आहे.
रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी सरकारने काय करणे अपेक्षित आहे? याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी 1923 च्या शेवटी त्यांना बहाल केली. ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ची सुधारित आवृत्ती 1923 मध्ये इंग्लंडमधील आर. एस. किंग. अँन्ड सन्स लिमिटेड या कंपनीने प्रकाशित केली. या ग्रंथात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी रुपयाचे प्रमाण पौंडाशी त्यांच्या व्यापार्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने कसे सोयीस्कर बसवले होते, त्यामुळे भारतीय लोकांचे कसे अपरिमित नुकसान केले, यावर डॉ. आंबेडकरांनी प्रकाश टाकला आहे.
आपल्या प्रबंधात आंबेडकरांनी अठराव्या शतकापासून सुरुवात केली आहे. तेव्हा भारतात सोने व चांदीचा वापर मुद्रेचा आधार म्हणून प्रचलित होता. मुघलांच्या पश्चात विविध राजांनी स्वतःची नाणी प्रचलित करून चलनाचा गोंधळ घातला होता. रुपया हेच नाणे सर्वत्र प्रचलित होते. पण त्यातील चांदीचे प्रमाण कमी जास्त होते. 1835 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कायदा करून संपूर्ण भारतासाठी एकच चलन अमलात आणले. हेच चलन म्हणजे एक तोळा वजनाचा चांदीचा रुपया हे होते. हाच प्रवास भारतीय चलनासाठी दोन धातूपासून सुरू होऊन एक धातू ही पद्धत अस्तित्वात आली.
या काळात सरकारी टाकसाळीमध्ये सोन्याच्या मुद्राही तयार केल्या जात, कारण त्यात सरकारला नफा मिळे. परंतु याला कायदेशीर चलन म्हणून मान्यता नव्हती. सोन्याच्या नाण्यांना अधिकृत दर्जा द्यावा अशी मागणी होत होती. परंतु खर्चाचे कारण पुढे करून सरकारने चांदीच्या रुपयासोबत कागदी नोटा सुरू केल्या, म्हणून भारतात चांदीचे रुपये व कागदी नोटा अशी मिश्र चलन पद्धत अस्तित्वात होती.
कोणत्याही चलन पद्धतीमध्ये चलनाचे मूल्य स्थिर असणे हितावह असते, पण भारतीय पद्धतीत हा गुण नव्हता. येथे मोठे चढ आणि उतार होत असत. याचे कारण मुख्य म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्यात विस्तार किंवा घट करण्याची लवचिकता यात नव्हती. याच सुमारास इंग्लंडमध्ये उद्योगधंद्यांची अधोगती तर भारतीय उद्योगधंद्याची भरभराट होत होती. परंतु डॉ. आंबेडकरांप्रमाणे हे भरभराटीचे नव्हे तर रोगट चलनाचे लक्षण होते. जसे वस्तूंचे मूल्य वाढत होते परंतु त्या वस्तू तयार करणार्या कामगारांच्या वेतनात फार फरक पडत नव्हता.
अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध होते. परंतु निश्चित धोरणाचा अभाव असल्यामुळे भारतात गंभीर मौद्रिक परिस्थिती 1878 मध्ये होती तीच 1893 मध्येसुद्धा होती. हे दोन मार्ग म्हणजेच भारतातील चलन सुधारणांचा इतिहास आहे. यातील पहिला मार्ग म्हणजे सोने अधिकृतपणे भारतीय चलनात आणण्याचा होय आणि दुसरा म्हणजे दोन धातूंची प्रणाली रूढ करण्याचा होता. परंतु ब्रिटिश सरकारच्या दबावामुळे भारताला चांदीची प्रणाली सुरू ठेवावी लागली आणि यात पंधरा वर्षांचा काळ वाया गेला. शेवटी 26 जून 1893 पासून सरकारने इंग्लिश सुवर्ण नाणी आणि त्याच्या बदल्यात नोटा देण्याची सोय करण्यात आली.
यातील सर्वात घातक भाग म्हणजे रुपये तयार करण्याचा अधिकार सरकारला दिला होता. यामुळेच केवळ नफ्यासाठी सरकार नोटा छापत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की नोटांचा पुरवठा वाढून त्याचे मूल्य घटू लागले. त्यामुळे किमती वाढू लागल्या. थोडक्यात चलनाचा विस्तार झाल्यामुळे त्याची क्रयशक्ती घटली, रुपयाचे विनिमूल्य हे शेवटी त्याच्या क्रयशक्तीद्वारे निर्धारित होते हेच आंबेडकरांचे ठाम मत होते. सरकारने नोटा छापण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून चलनाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त केल्यामुळे रुपयाचे मूल्य घटले होते. हा पुरवठा जर नियंत्रित केला तर रुपयाचे मूल्य टिकून राहू शकले असते, हाच प्रमुख मुद्दा आंबेडकरांनी मांडला होता. सरकारने रूढ केलेली पद्धत सुवर्ण प्रणाली नव्हती तसेच ती सुवर्ण विनिमय पद्धतही नव्हती. ती केवळ अपरिवर्तनीय रुपया पद्धत होती. डॉ. आंबेडकरांना पूर्ण विश्वास होता की भारतासाठी सुवर्ण प्रणालीस योग्य राहील व त्यासाठी भारताचे सुवर्णचलन असावे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या प्रबंधाच्या शेवटी डॉ. आंबेडकर म्हणतात, की रुपयाची निर्मिती पूर्णपणे थांबविल्यास भारतीय चलन खर्या अर्थाने आणि येथील किमतीसुद्धा बर्याच स्थिर राहतील आणि रुपयाचा विनिमयसुद्धा सुरक्षित होईल. रुपयाचा प्रश्न निर्माण होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे सरकारचा अविवेक! त्यामुळे चलनाचा व्यवस्थापन करण्याचा अधिकार सरकारकडून काढून घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी यात शेवटी दिला. ह्यातूनच शेवटी भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली.
रिझर्व्ह बँकेचा जन्म हा भारतातील चलन निर्मिती नियंत्रित करणारी संस्था म्हणून झाला. परंतु सध्या ती चलनाचा अतिपुरवठा करून रुपयाची क्रयशक्ती घटवित आहे, त्यामुळेच रुपयाचे मूल्य घटते आहे. आज आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी सर्व राष्ट्रांना वित्तीय तूट विशिष्ट मर्यादित असावी ही अट घालते. चलनाच्या पुरवठ्यावर विशिष्ट नियंत्रण असणे, हे त्याकाळी आणि सध्याच्या परिस्थितीतही किती आवश्यक आहे हे दिसून येते. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांचा प्रबंध जरी 100 वर्षांपूर्वीचा असला तरी त्याचे मूल्य आज थोडेही कमी झालेले नाही.





