विशेष : सी. आर. राव “थेरम’

– विलास पंढरी
गणित आणि संख्याशास्त्रामध्ये मूलभूत योगदान देणारे गणितज्ज्ञ सी. आर. राव यांना “इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ हा गणितातील नोबेल अशी ओळख असलेला पुरस्कार जाहीर झाला आहे.
कल्यमपुडी राधाकृष्ण राव हे एक प्रख्यात भारतीय-अमेरिकन गणितज्ज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ. त्यांना सांख्यिकी विचारात क्रांती घडवून आणलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधनिबंधासाठी सन 2023 चा या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतूल्य असलेला सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. राव यांच्या 75 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वीच्या कार्याचा विज्ञानावर खोलवर प्रभाव पडतो, असे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सांख्यिकी प्रतिष्ठानने एका निवेदनात म्हटले आहे.
1885 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्था ही 150 हून अधिक देशांमध्ये वैयक्तिक आणि संस्थात्मक सदस्यांसह एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी गैर-सरकारी संस्था आहे. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळे सात विभाग किंवा उपसंस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय) नेटवर्कमध्ये जगभरातील बहुतेक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालये समाविष्ट आहेत आणि त्यांचे संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्था आणि निवडक व्यावसायिक संस्थांशी देखील संबंध आहेत. आयएसआय सांख्यिकी व्यावसायिकांना सामान्य मूल्ये आणि अनुभवांवर आधारित वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. आयएसआय ही संस्था संलग्न संघटनांच्या पुरस्कार व्यवस्थापनास मदत, अभ्यासक्रम आणि क्षमता निर्माण प्रतिष्ठित पुरस्कार सांख्यिकीय यश आणि सिद्धी ओळखण्यास मदत करते तसेच विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी विकसनशील देशांतील सदस्यांचे समर्थन मिळवते आणि त्यांचे व्यवस्थापन करते.
ही संस्था हे कौशल्य आणि नेतृत्व विकास मार्गदर्शन कार्यक्रम विकसित करण्यासाठी कार्यशाळांसह इतर भागधारकांच्या भागीदारीसह सांख्यिकीय क्षमता निर्माण कार्यक्रम देखील विकसित आणि वितरित करते. सांख्यिकीय करिअरला प्रोत्साहन देण्यासाठी आयएसआय विविध उपक्रम आयोजित करते. आयएसआयचे कार्य मोठ्या प्रमाणावर 1957 पासून सुरू झाले असून आता त्यासाठी बनविलेल्या सात स्पेशलाइज्ड असोसिएशन्समार्फत चालविले जाते. या संस्थेला 1949 पासून युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आणि युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल डिव्हिजन सह सल्लागार असा दर्जा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेची दर दोन वर्षांनी कॉन्फरन्स होते, ज्यात पुरस्कार वितरीत केले जातात. येत्या जुलैमध्ये भरणाऱ्या कॅनडातील ओटावा येथे सांख्यिकी संस्था सांख्यिकी कॉंग्रेसमध्ये सी. आर. राव यांना 80 हजार अमेरिकन डॉलर रकमेसह विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
सी. आर. राव यांना “इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ या पुरस्काराने तब्बल 75 वर्षांनंतर त्यांनी 1945 मध्ये मांडलेल्या शोधनिबंधासाठी गौरविण्यात येत आहे. गणित आणि संख्याशास्त्रामध्ये मूलगामी ठरणारा राव यांचा शोधनिबंध 1945 मध्ये कलकत्ता मॅथेमॅटिकल सोसायटीच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी मांडलेल्या माहितीमधून “क्रेमर-राव लोअर बाउंड’, “राव-ब्लॅकवेल थेरम’ आणि “इन्फर्मेशन जिओमेट्री’ असे संख्याशास्त्राची दिशा बदलणारे तीन निष्कर्ष समोर आले होते. माहितीच्या प्रचंड मोठ्या जंजाळातून हवी ती माहिती कशी मिळवायची यासाठी हे संशोधन उपयोगी ठरत असल्याने पुरस्कार देण्याइतपत महत्त्व असल्याचे उशिरा का होईना लक्षात आल्याने वयाचे शतक ओलांडल्यावर राव यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लार्ज हायड्रॉन कोलायडरपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रडार यंत्रणा यांसारख्या अनेक आधुनिक प्रणालींमध्ये राव यांच्या संशोधनाचा फायदा आजही होत आहे.
सी आर उर्फ कल्यमपुडी राधाकृष्ण राव यांचा जन्म कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हदगली गावात एका तेलुगू कुटुंबात 10 सप्टेंबर 1920 रोजी झाला. आंध्र विद्यापीठातून ते एमएस्सी झाले आणि त्यांनी 1941 मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून काम सुरू केले. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून 1945 मध्ये पीएच.डी. मिळवली, तर 1965 मध्ये डी.एसस्सी. ही पदवी प्राप्त केली. सध्या म्हणजे वयाच्या शंभरीनंतर ते पेनसिल्वानिया विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राव भारतातील नोकरीच्या नियमानुसार वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांनासोबत मुलीकडे रहायला गेले. तिथे वयाच्या 62 व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्र विषयाचे प्राध्यापक तर वयाच्या 70 व्या वर्षी पेनसिल्व्हानीया विद्यापीठात विभाग प्रमुख झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
राव भारतीय मनोवृत्तीबद्दल खंत व्यक्त करताना म्हणतात, भारतात सेवानिवृत्त झाल्यावर कोणी विचारीत नाही. अगदी शिपाईसुद्धा पदावर असताना केवळ नमस्कार करील. सहकारी देखील सत्तेचाच आदर करतात, प्रज्ञेचा नाही. या वृत्तीत खरे तर बदल होणे अपेक्षित आहे. त्यांच्या संशोधनातील मूलभूत योगदानासाठी भारतात सरकारने त्यांना पद्मभूषण (1968) आणि पद्मविभूषण (2001) देऊन अगोदरच गौरविले आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, वयाची सेंच्युरी ठोकून कार्यरत असलेल्या कल्यमपुडी राधाकृष्ण राव यांच्याकडून तरुणांनी, विशेषतः शास्त्रज्ञांनी प्रेरणा घेत नवीन संशोधन करीत अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल.





