विशेष : अखंड ज्ञानदीप!
आज संत ज्ञानेश्वर महाराजांची (Sant Dnyaneshwar) जयंती. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षाच्या अंधारातून उगवलेल्या ज्ञानसूर्याची अद्भुत गाथा.

– ह.भ.प. विशाल गडगे
Sant Dnyaneshwar : आज संत ज्ञानेश्वर महाराजांची (Sant Dnyaneshwar) जयंती. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षाच्या अंधारातून उगवलेल्या ज्ञानसूर्याची अद्भुत गाथा. अल्पायुष्य लाभूनही त्यांनी महाराष्ट्राच्या अध्यात्म, साहित्य, भाषा आणि समाजजीवनावर ठसा उमटविला. शतकानुशतके उलटूनही हा ज्ञानदीप अखंडपणे तेवत आहे.
सातशेहून अधिक वर्षांचा काळ लोटला. पिढ्या बदलल्या, जगण्याची साधने बदलली, विज्ञान-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले; पण माणसाच्या मनातील प्रश्न मात्र आजही संपलेले नाहीत. अशा वेळी आळंदीच्या इंद्रायणी तीरावरून प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपल्याला खुणावतो. ‘ज्ञानेश्वर माऊली’ (Sant Dnyaneshwar) हा केवळ एका संताचा जयघोष नाही; ज्ञान, भक्ती, समता, करुणा आणि विश्वकल्याणाच्या विचारांनी भारलेली ती एक जीवनदृष्टी आहे.
ज्ञानेश्वर माऊलींचे (Sant Dnyaneshwar) वडील विठ्ठलपंत हे विद्वान आणि धार्मिक वृत्तीचे होते. वैराग्याच्या ओढीने त्यांनी संन्यास स्वीकारला; पुढे गुरूंच्या आदेशानुसार त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात परतावे लागले. तत्कालीन समाजव्यवस्थेने या घटनेकडे संकुचित नजरेने पाहिल्याने या कुटुंबाला सामाजिक बहिष्कार आणि उपेक्षेला सामोरे जावे लागले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई या चारही भावंडांच्या बालपणावर संघर्षाची छाया होती. मात्र, या दुःखाने ते खचले नाही.
उलट, जीवनातील वेदनांनी त्यांच्या विचारांना अधिक विशाल केले. समाजातील उपेक्षितांच्या दुःखाशी जोडणारी संवेदनशीलता त्यांच्या जीवनानुभवातूनच विकसित झाली. म्हणूनच ज्ञानेश्वरांचे अध्यात्म हे केवळ वैयक्तिक मोक्षाचे नाही; ते माणसाला माणसाशी जोडणारे अध्यात्म आहे.
थोरले बंधू निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते. नाथसंप्रदायाची साधना आणि आत्मज्ञानाची दिशा त्यांना निवृत्तीनाथांकडून लाभली. अल्पवयातच त्यांनी आत्मज्ञानाचा व्यापक अर्थ समजून घेतला; परंतु ते ज्ञान स्वतःपुरते न ठेवता सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी ध्यास घेतला. तो काळ संस्कृतप्रधान ज्ञानपरंपरेचा होता.
धर्मग्रंथांचे ज्ञान मोजक्या वर्गापुरते मर्यादित होते. सामान्य माणसाला अध्यात्माच्या गाभ्यापर्यंत सहज पोहोचता येत नव्हते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी लोकभाषेची निवड केली. हा केवळ भाषेचा निर्णय नव्हता; तो समाजाला ज्ञानाच्या प्रवाहात सहभागी करून घेणारा निर्णय होता.
नेवासा येथे त्यांनी भगवद्गीतेवरील ओवीबद्ध भाष्य ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाच्या रूपाने साकारले. ज्ञानेश्वरी हे केवळ गीतेचे भाषांतर नाही. गीतेतील गहन तत्त्वज्ञान लोकभाषेत, लोकजीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे हे महान कार्य आहे. संस्कृतमधील ज्ञानाचे दालन मराठी भाषेत खुले करून त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याला वैचारिक उंची प्राप्त करून दिली.
‘अमृतानुभव’ या ग्रंथातून आत्मस्वरूप, अद्वैत आणि आत्मबोधाचे गहन चिंतन प्रकट होते. तर ‘चांगदेव पासष्टी’मधून सिद्धी आणि सामर्थ्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ असल्याचा संदेश मिळतो. अहंकारापेक्षा नम्रता आणि बाह्य प्रदर्शनापेक्षा अंतर्मनातील आत्मबोध अधिक महत्त्वाचा आहे, ही त्यांची जीवनदृष्टी होती.ज्ञानेश्वरांचे कार्य केवळ ग्रंथरचनेपुरते मर्यादित नव्हते.
माणसाचे श्रेष्ठत्व जन्मावर किंवा जातीवर ठरत नाही; त्याचे ज्ञान, आचरण आणि जीवनमूल्ये त्याला महान बनवितात, अशी व्यापक दृष्टी त्यांच्या विचारांत होती. संत नामदेव महाराजांशी झालेल्या सहवासातून ज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय अधिक व्यापक झाला.
वारकरी विचारप्रवाहाला या संतपरंपरेने लोकाधिष्ठित बळ दिले. ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा केंद्रबिंदू केवळ वैयक्तिक मोक्ष नव्हता. त्यांच्या चिंतनात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची व्यापक भावना होती. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी मागितलेले ‘पसायदान’ ही केवळ प्रार्थना नसून विश्वमानवतेच्या मंगलतेची आकांक्षा आहे.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो…
वाढता द्वेष, हिंसा आणि माणसामाणसांतील दुरावा पाहताना ही प्रार्थना आजही तितकीच समकालीन वाटते. माऊलींची इच्छा स्वतःच्या सुखापुरती मर्यादित नव्हती.
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात।
प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे आणि जगात परस्पर मैत्री नांदावी, ही विश्वकल्याणाची भावना त्यांच्या विचारविश्वाचा सर्वोच्च आविष्कार आहे. श्रीक्षेत्र आळंदीतील त्यांची संजीवन समाधी हा महाराष्ट्राच्या श्रद्धाविश्वातील अत्यंत पवित्र अध्याय आहे. देहरूपाने माऊली समाधिस्थ झाले; पण त्यांच्या विचारांचा प्रवाह कधीच थांबला नाही.
आजही आळंदी ही लाखो भाविकांसाठी ज्ञान, भक्ती आणि मानवतेच्या अखंड प्रवाहाची भूमी आहे. दरवर्षी माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करते, तेव्हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे अद्भुत दर्शन घडते. वारीच्या वाटेवर अपरिचित माणसेही एकमेकांना ‘माऊली’ म्हणून हाक मारतात. जात, पंथ आणि आर्थिक स्थितीच्या भिंती दुय्यम ठरतात. हाच ज्ञानेश्वरांच्या विश्वबंधुत्वाचा जिवंत अनुभव आहे.
आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले, तरी माणसामाणसांतील अंतर वाढताना दिसते. अशा वेळी ज्ञानाला विवेकाची जोड, भक्तीला मानवतेची साथ आणि अध्यात्माला सामाजिक बांधिलकी देणारा ज्ञानेश्वर माऊलींचा (Sant Dnyaneshwar) संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. केवळ ‘ज्ञानोबा माऊली’चा जयघोष पुरेसा नाही; त्यांच्या समतेचा, करुणेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश आपल्या आचरणात उतरला पाहिजे. त्या ज्ञानसूर्याचा प्रकाश आपल्या विचारांत उतरू दे, समाजजीवनात समता, बंधुता आणि करुणेचा दीप प्रज्वलित होऊ दे.






