विशेष : एक संवाद महत्त्वाचा!
आत्महत्या (World Suicide Prevention Day) हा यक्षप्रश्न आजही सुटलेला नाही.

– ह.भ.प. श्री. विशाल गडगे
World Suicide Prevention Day : आत्महत्या (World Suicide Prevention Day) हा यक्षप्रश्न आजही सुटलेला नाही. शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार-नोकरदार, उद्योगपती, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, मुले-मुली असा एकही घटक सुटलेला नाही ज्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नाही. पण एक संवादही एका जीवाला वाचवू शकतो! आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जनजागृती पर विशेष लेख.
एखादा माणूस आपल्या आसपास असतो. नेहमीसारखा बोलतो, हसतो, कामावर जातो, मित्रांमध्ये मिसळतो. आपणही त्याला पाहतो आणि मनाशी म्हणतो, ‘सगळं ठीक आहे.’ पण खरंच सगळं ठीक असतं का? चेहर्यावर दिसणारे हसू आणि मनात सुरू असलेली घुसमट (World Suicide Prevention Day) यांच्यामध्ये कधी कधी मोठे अंतर असते. ते अंतर आपल्याला दिसत नाही, कारण माणूस आपल्या वेदना अनेकदा स्वतः पुरत्याच ठेवतो. याच ठिकाणी संवादाची खरी गरज निर्माण होते.
10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध (World Suicide Prevention Day) दिन. 2024 ते 2026 या कालावधीसाठी Changing the Narrative on Suicide म्हणजेच आत्महत्येविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा संदेश दिला जात आहे. 2026 हे या मोहिमेचे अंतिम वर्ष आहे. पण आत्महत्या प्रतिबंध हा एखाद्या दिवसाचा विषय नाही. तो आपल्या घरातील, शाळेतील, कामाच्या ठिकाणी आणि समाजातील रोजच्या वागण्यात दिसला पाहिजे.
आपण एखाद्याला विचारतो, ‘काय चाललंय?’ पण त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरोखर थांबतो का? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आजच्या जगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. चांगले शिक्षण, उत्तम नोकरी, आर्थिक स्थैर्य, यशस्वी करिअर, चांगले घर, अपेक्षांची यादी मोठी होत चालली आहे. मात्र या धावपळीत मनाचा थकवा कुठे व्यक्त करायचा, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो.
परीक्षेतील अपयश, नोकरीची चिंता, बेरोजगारी, आर्थिक अडचणी, नात्यांमधील तणाव, प्रेमभंग, कुटुंबातील संघर्ष, सततची तुलना, एकटेपणा किंवा भविष्याची भीती यापैकी कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी त्या क्षणी असह्य वाटू शकते. आत्महत्येमागे एकच कारण असते, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. अनेक परिस्थिती एकत्र येऊन मनावरचा ताण वाढवत असतात. पण एखादी व्यक्ती त्या संघर्षातून जात असताना आपण तिच्याजवळ होतो का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
आपल्याकडे मानसिक त्रासाबद्दल बोलताना अजूनही संकोच आहे. शरीराला त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणे स्वाभाविक मानले जाते; पण मन थकले, खचले किंवा अस्वस्थ झाले तर ‘धीर धर, जास्त विचार करू नकोस, सगळ्यांनाच अडचणी असतात’ असे सांगून विषय संपवला जातो. कदाचित समोरच्या माणसाला त्या क्षणी सल्ला नकोच असेल. त्याला फक्त कुणीतरी शांतपणे ऐकावे असे वाटत असेल. ‘काय झाले? माझ्याशी बोल. तू एकटा नाहीस.’ एवढे साधे शब्दही कधी कधी मोठा आधार देऊ शकतात. म्हणूनच आत्महत्या प्रतिबंधाची सुरुवात मोठ्या भाषणातून नव्हे, तर साध्या माणुसकीतून होते.
यामध्ये कुटुंबाची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. मुलाने किती गुण मिळवले याची चिंता जितकी असते, तितकीच त्याच्या मनात काय चालले आहे, याचीही असायला हवी. तरुण मुलगा किंवा मुलगी शांत असेल, सतत स्वतःमध्ये मग्न राहात असेल किंवा वागण्यात लक्षणीय बदल जाणवत असेल, तर त्याकडे ‘वयाचा परिणाम’ म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी प्रेमाने संवाद साधणे गरजेचे आहे. वृद्धांच्या बाबतीतही हेच लागू होते. घरात माणसे भरपूर असली, तरी मनाने एकटे पडण्याची शक्यता असते. म्हणून एकत्र राहणे पुरेसे नाही; एकमेकांच्या मनात राहणे महत्त्वाचे आहे.
शाळा-महाविद्यालये आणि ऑफिसमध्येही या विषयाकडे गांभीर्याने पाहावे लागेल. विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा शिकवून चालणार नाही; अपयश स्वीकारण्याची आणि मदत मागण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल. शिक्षक, पालक, मित्र आणि सहकारी यांनी संकटात असलेल्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी योग्य मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महत्या प्रतिबंधाची जबाबदारी केवळ मानसोपचारतज्ज्ञांची नाही. समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्ती या कामात योगदान देऊ शकते.
माध्यमांची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. आत्महत्येच्या घटनांचे सनसनाटीकरण, पद्धतीचे अनावश्यक वर्णन किंवा खासगी आयुष्याची चर्चा टाळली पाहिजे. बातमी देताना संवेदनशीलता राखली आणि त्यासोबत मदत कुठे मिळू शकते, आशेचे पर्याय कोणते आहेत, हे सांगितले तर माध्यमे समाजासाठी अधिक उपयुक्त ठरतील.
आपल्या संतपरंपरेने माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा विचार दिला आहे. दुःखात असलेल्या व्यक्तीपासून दूर जाण्याऐवजी तिच्याजवळ बसणे, तिचे म्हणणे ऐकणे आणि तिला आधार देणे हीच खरी माणुसकी. आपण देवापुढे दिवा लावतो. पण एखाद्या निराश मनात आशेचा छोटासा प्रकाश निर्माण झाला, तर तोही तितकाच पवित्र आहे.
कुणाच्या शांततेत दडलेला प्रश्न ऐकूया. कुणाच्या बदललेल्या वागण्यातला संकेत समजून घेऊया. मदत मागणार्याला कमजोर समजू नका आणि गरज पडली तर तज्ज्ञांची मदत घेण्यास त्याला प्रोत्साहन देऊया. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ जनजागृतीचा दिवस न राहता संवादाचा संकल्प करण्याचा दिवस व्हावा. आज आपल्या एखाद्या मित्राला फोन करूया.
कुणाची विचारपूस करूया. घरात थोडा वेळ मोबाइल बाजूला ठेवून बोलूया आणि कुणी मन मोकळे करत असेल तर त्याला मध्येच तोडण्याऐवजी शांतपणे ऐकूया. कदाचित आपल्याला ते फार मोठे काम वाटणार नाही; पण समोरच्या व्यक्तीसाठी ते आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे क्षण ठरू शकतात.
कधी कधी औषधापूर्वी आधाराची गरज असते, सल्ल्यापूर्वी ऐकून घेणार्या कानाची गरज असते आणि अंधारातून बाहेर पडण्यासाठी एका हाताची गरज असते. म्हणून संवाद साधूया. माणसाला माणूस म्हणून समजून घेऊया. कारण एक संवाद (World Suicide Prevention Day) एका जीवाला वाचवू शकतो!






