SpaceX : स्पेसएक्सचे ‘स्टारशिप’ उड्डाण रद्द; मस्क यांच्या कंपनीचे शेअर्स घसरले
अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'स्पेसएक्स' कंपनीला (SpaceX) एका मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आहे.

SpaceX : अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्पेसएक्स‘ कंपनीला (SpaceX) एका मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी एका महत्त्वाच्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज झालेले ‘स्टारशिप’ रॉकेट तांत्रिक बिघाडामुळे ऐनवेळी प्रक्षेपित करता आले नाही. यामुळे बाजार बंद झाल्यानंतरच्या व्यवहारात स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
टेक्सासमधील केंद्रावरून प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू झाले होते, परंतु बूस्टर इंजिन सुरू होण्याच्या अगदी काही सेकंद आधी ही मोहीम आपोआप रद्द करण्यात आली.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले की, काही इंजिन वेळेवर सुरू न झाल्याने उड्डाण संगणकीय प्रणालीद्वारे थांबवण्यात आले. पुढील काही दिवसांत पुन्हा प्रक्षेपणाचा प्रयत्न केला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जून महिन्यात स्पेसएक्सने (SpaceX) स्टारलिंक सॅटेलाइट नेटवर्क विस्तार, शोध मोहिमा आणि कक्षेत ‘एआय’ उपग्रह नेटवर्क विकसित करण्याच्या आश्वासनावर ऐतिहासिक सार्वजनिक भागविक्री (पब्लिक ऑफरिंग) यशस्वी केली होती. या सर्व महत्त्वाकांक्षी योजना स्टारशिप रॉकेटच्या यशस्वी उड्डाणावर अवलंबून असल्याने, या तांत्रिक अपयशाचा गुंतवणूकदारांना तात्पुरता फटका बसला आहे.





