Elon Musk : एलन मस्क ठरले जगातील पहिले ‘खरबपती’; ‘स्पेसएक्स’च्या दमदार IPOची कमाल
Elon Musk : उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या बहुचर्चित आयपीओला अमेरिकन शेअर बाजारात दमदार प्रतिसाद मिळाला असून, या लिस्टिंगमुळे मस्क यांनी इतिहासातील पहिले ‘खरबपती’ (ट्रिलियन डॉलर संपत्ती असलेले) व्यक्ती म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Elon Musk : उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या बहुचर्चित आयपीओला अमेरिकन शेअर बाजारात दमदार प्रतिसाद मिळाला असून, या लिस्टिंगमुळे मस्क यांनी इतिहासातील पहिले ‘खरबपती’ (ट्रिलियन डॉलर संपत्ती असलेले) व्यक्ती म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम आकडेवारीनुसार, त्यांची एकूण संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलर (सुमारे ९४.६ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.
१२ जून रोजी नॅस्डॅकवर स्पेसएक्सचे समभाग १३५ डॉलरच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ११ टक्के वाढीसह १५० डॉलरवर सूचीबद्ध झाले. या यशस्वी लिस्टिंगनंतर कंपनीचे बाजारमूल्य सुमारे १.९६ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले असून, ती अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी ठरली आहे.
मस्ककडे ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा –
एलन मस्क यांच्याकडे स्पेसएक्समधील ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. नासा तसेच व्यावसायिक अंतराळ मोहिमांसाठी रॉकेट, अंतराळयान आणि विविध पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम ही कंपनी करते. याशिवाय स्टारलिंक इंटरनेट सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील xAI यांसारखे उपक्रमही मस्क यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा भाग आहेत.
विशेष म्हणजे, प्रचंड बाजारमूल्य असूनही स्पेसएक्स सध्या तोट्यात आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला सुमारे ५ अब्ज डॉलरचा तोटा झाला होता. मात्र, रॉकेट, उपग्रह नेटवर्क, अंतराळ तंत्रज्ञान आणि भविष्यातील अत्याधुनिक प्रकल्पांमधील मोठ्या संधींमुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवर मोठा विश्वास असल्याचे दिसून आले.
अंतराळात एआय डेटा सेंटर्स –
स्पेसएक्सने भविष्यात अंतराळात एआय डेटा सेंटर्स उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या अंदाजानुसार तिच्यासमोर सुमारे २८.५ ट्रिलियन डॉलरच्या संभाव्य बाजारपेठेची संधी उपलब्ध असून, त्यात ब्रॉडबँड व्यवसायासाठी ८७० अब्ज डॉलर आणि स्टारलिंक मोबाईल सेवांसाठी ७४० अब्ज डॉलरच्या बाजाराचा समावेश आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, आयपीओपूर्वी एलन मस्क यांची संपत्ती ९७१ अब्ज डॉलर होती. स्पेसएक्सच्या लिस्टिंगनंतर ती १ ट्रिलियन डॉलरचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून १.१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली. तुलनेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक लॅरी पेज यांची संपत्ती ३०४ अब्ज डॉलर इतकी असल्याने मस्क आणि इतर अब्जाधीशांमधील आर्थिक दरी आणखी वाढली आहे.





