NASA vs SpaceX : स्पेसएक्सचे ‘स्टारशिप’ जमिनीवरच; नासाच्या चंद्र मोहिमेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह
नासा देखील याच रॉकेटच्या साहाय्याने २०२८ पर्यंत अंतराळवीरांना पुन्हा चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर या चौकशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

NASA vs SpaceX : गेल्या आठवड्यात झालेल्या चाचणी उड्डाणातील तांत्रिक बिघाडामुळे स्पेसएक्स कंपनीच्या ‘स्टारशिप’ रॉकेट्सचे पुढील प्रक्षेपण तूर्तास थांबवण्यात आले आहे.
या मेगा रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील बूस्टरच्या कामगिरीत बिघाड झाल्यामुळे एका तासाच्या अंतराळ प्रवासात अपघात झाला. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत रॉकेट्स जमिनीवरच थांबतील, असे अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एफएए) जाहीर केले आहे.
शुक्रवारी टेक्सासमधून स्टारशिपने यशस्वी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच रॉकेटचा मुख्य बूस्टर नेहमीप्रमाणे वेगळा झाला, परंतु पृथ्वीकडे परत येत असताना त्याची इंजिने अचानक बंद पडली.
मेक्सिकोच्या आखातात नियंत्रित पद्धतीने संथ गतीने उतरण्याऐवजी, हा बूस्टर प्रचंड वेगाने समुद्रात आदळला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे एफएएने स्पष्ट केले आहे. आता या संपूर्ण चौकशीवर एफएए स्वतः देखरेख ठेवणार आहे.
या तांत्रिक बिघाडानंतरही अंतराळयानाने आपला पुढील प्रवास सुरू ठेवला होता. हिंद महासागरात नियोजित वेळेनुसार उतरण्यापूर्वी या यानाने अंतराळात २० नमुना उपग्रह यशस्वीरीत्या सोडले.
४०७ फूट (१२४ मीटर) लांबीचे हे रॉकेट स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट आहे, जे मानवाला मंगळावर नेण्यासाठी विकसित केले जात आहे.
नासा देखील याच रॉकेटच्या साहाय्याने २०२८ पर्यंत अंतराळवीरांना पुन्हा चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर या चौकशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.





