Massive Fire : भीषण आगीत 16 विद्यार्थीनी मृत्युमुखी, तर ७९ जण गंभीर जखमी
केनियातील मुलींच्या एका निवासी शाळेत रात्रीच्या वेळी लागलेल्या भीषण आगीत १६ विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू झाला.

Massive Fire : केनियातील मुलींच्या एका निवासी शाळेत रात्रीच्या वेळी लागलेल्या भीषण आगीत १६ विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर ७९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिक्षण मंत्री ज्युलियस ओगाम्बा यांनी या दुर्दैवी घटनेची अधिकृत माहिती दिली. मध्य केनियाच्या गिलगिल भागातील ‘उतुमिषी गर्ल्स स्कूल’ या बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात ही आग भडकली. या शाळेमध्ये ८०० हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
आग लागल्याचे समजताच एकच खळबळ उडाली, मात्र आग एवढी वेगाने पसरली की अनेक विद्यार्थिनींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. सध्या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केनियातील निवासी शाळांमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत असून, काही घटना विद्युत बिघाडामुळे तर काही जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमुळे घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.





