Nagar | जिल्ह्यात सोयाबीन, तूरीची सर्वाधिक पेरणी, बाजरीत मात्र घट

नगर, (प्रतिनिधी) – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृगनक्षत्रात पावसाने जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात खरीप हंगामात सुरुवातीलाच मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद, कपाशीसह चारा पिकांच्या क्षेत्रात पेरणी झाली.
जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर असून प्रत्यक्षात मात्र वाढ होवून १ लाख ५१ हजार १९७ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तूरची ३६ हजार १०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यात दुपटीने वाढ झाली असून जिल्ह्यात ६५ हजार ९४६ इतकी पेरणी झाली आहे. मात्र, बाजरी पिकाची घट झाली असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये दिसत आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 5 लाख 79 हजार हेक्टर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्ताविक करतात. यानुसार यंदा ६ लाख ४२ हजार हेक्टवर खरिपाच्या पेरण्या प्रस्ताविक करण्यात आल्या होत्या.
मात्र, पावसाच्या बदललेल्या चित्राने खरीप हंगामासोबत कृषी विभागाचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यात विशेष करून दक्षिण भागात नगर, पारनेर, कर्जत, जामखेड आणि उत्तर नगर जिल्ह्यातील पठार भागात कडधान्य पिकांच्या पेरण्या होतात. यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, मटकी या कडधान्य पिकांचा समावेश असून जिल्ह्याच्या उर्वरित भागात बाजरी, सोयाबीन, कापूस, चारा पिकांसह ऊस लागवड करण्यात येते.
यंदा जिल्ह्यात काही भागात मृगनक्षत्रात जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा शिडकावा झाला. त्यात काही शेतकर्यांनी पेरणी केली असून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून मे आणि जून महिन्यांत माणसांसोबत जनावरांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसली.
आता पुन्हा पाऊस लांबल्याने उन्हाच्या झळा वाढत असून सर्वांना वरूणराजाची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याकडून कधी पावसाचा तर कधी तापमान वाढीचा इशारा देण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांसह सामन्य माणूस देखील चक्रावला असून पेरण्या लांबल्याने नगरची बाजारपेठ ठप्प होण्याची परिस्थिती आहे.
नगर जिल्ह्यात 30 जूनपर्यंत मूग आणि उडीद कडधान्य पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे. मात्र आता पावसाने हुलकावणी दिल्याने या कालावधीत या पिकांची पेरणी न झाल्यास या पिकांचे क्षेत्र दुसर्या पिकांकडे वळत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे मूग, उडिदााऐवजी सोयाबीन, कापूस, तूर आणि चारा पिकांचे क्षेत्र वाढ झाली.
मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत. अद्याप ही शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानुसार जिल्ह्यात कडधान्य पिकाची ८६ टक्के पेरणी झाली आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी क्षेत्र ८७ हजार ३३० हेक्टर असून मात्र प्रत्यक्षात वाढ होवून १ लाख ५१ हजार १९७ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर उडिदाची ४० हजार ४०५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
५७ हजार ७०२ क्षेत्रावर पेरणी झाली. मूग, ४८ हजार २०५ हेक्टर, तूर ३६ हजार १०४ हेक्टरवर सरासरी क्षेत्र आहे यात दुपटीने वाढ झाली असून जिल्ह्यात ६५ हजार ९४६ इतकी पेरणी झाली आहे. याचबरोबर बाजरी पिकाची ६५ हजार ९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर १ लाख ३५ हजार ९४० हेक्टरवर कपाशीची सर्वाधिक लागवड झाली आहे.





